Thursday, September 3, 2015

... पण बोलणार नाही !

शेअरिंग करताना समोरच्याला काय हवंय, याचा अंदाज घेऊन बोलायला लागतो आपण. यामध्ये ‘आपण’ कुठे असतो? कुठे हरवून बसतो स्वतःला? खरं गुज उकलतच नाही. बांध फुटतच नाही. आपण तरंगत राहतो, वरच्यावर. तिथल्या तिथेच चाचपडत राहतो. मग कशासाठी हा ‘व्यक्त’ व्हायचा अट्टहास?

बोलायची ऊर्मी कुठून येत असेल माणसात? सतत काहीतरी सांगावंसं का वाटत असेल समोरच्याला? ते ‘शेअर’ करण्यासाठी मग एक श्रोता हवा... ही ‘शेअर’ करण्याची आंतरिक निकड कुठून कुठे घेऊन आलीये, आज आपल्याला? आदिमानवाने अंधाऱ्या गुहेच्या भिंतींवर चित्रं काढली असतील, तीही याच गरजेतून; आणि आज आपण फेसबुक/ट्विटरच्या भिंतींवर आपले फोटो टाकतोय, तेही याच गरजेतून... पण आता ते केवढं अक्राळविक्राळ झालंय. आपल्याला ‘काय वाटतंय’ ते सांगायचं; ‘काय वाटत नाही’ तेही सांगायचं.
आपले वेगवेगळे मूड स्विंग्स ‘वॉल’वर काय चाललंय, त्याच्या आधारे ठरवायचे. आपल्या आवडीनिवडी तशाच वेगाने बदलत राहायच्या. त्या आधारे लोकांना आपल्याला जज करू द्यायचं! आणि आपणही तेच करायचं, लोकांबद्दल! ‘शेअरिंग इज केअरिंग’चा जाहिरातीचा डोस मुकाट्याने पिऊन टाकायचा... छोट्यातल्या छोट्या प्रसंगाचे फोटो न थकता अपलोड करायचे. ‘लाइक्स’ आणि ‘रिट्विट्स’वरून आपली लोकप्रियता मापत राहायची. हजार ग्रुप्स आहेत व्हॉट्सअॅप वर. पळत राहायचं इथून तिथे. ‘थम्सअप’, ‘टाळ्या’, आणि विविध हास-या चेह-यांच्या स्मायलीज पाठवत. आपला सगळीकडे प्रेझेन्स आहे, हे दाखवत. सगळंच ‘व्हर्च्युअल’... पण इतकं सगळं होऊनही तहान भागत नाही, ती नाहीच... आमच्या ‘समुद्र’ नाटकातली नंदिनी फार सुंदर सांगते, तिचं म्हणणं... रोजच्या जगण्यातले विषय, चित्रपट, गॉसिप्स हे सगळं झालंच. ‘पण याच्या पलीकडेही आपल्या मनात सतत काहीतरी चालू असतंच ना? ते त्या क्षणी कोणाला तरी सांगावंसं वाटतं. मग ते काहीही असेल, कदाचित अगदी क्षुल्लकही असेल.’ हे ‘सांगावंसं’ वाटण्याची आच जितकी तीव्र, तितकेच बसणारे चटकेही दाहक!
हे शेअरिंग अनेक पातळ्यांवरचं असतं. कधी अगदी खासगी, वैयक्तिक, कधी अगदी हिशेबी, फायदा बघून. कधी घरगुती, कधी बुद्धिजीवी. कधी कोंडमारा असह्य झाल्याचं, कधी आनंदाचा अतिरेक झाल्याचं. व्यक्त व्हायचं, एवढं नक्की. त्यासाठी वेगवेगळी माध्यमं शोधायची. कधी कधी माणसांनाच ‘माध्यम’ म्हणून वापरायचं! कोणासोबत, कधी, काय शेअर करायचं, याचेसुद्धा आडाखे बांधले जाऊ लागतात. आणि मग शेअरिंग करताना समोरच्याला काय हवंय, याचा अंदाज घेऊन बोलायला लागतो आपण. ‘त्याला’ आवडेल तसं... ‘त्याला’ आवडेल ते! यामध्ये ‘आपण’ कुठे असतो? कुठे हरवून बसतो स्वतःला? खरं गुज उकलतच नाही. बांध फुटतच नाही. आपण तरंगत राहतो, वरच्यावर. तिथल्या तिथेच चाचपडत राहतो. मग कशासाठी हा ‘व्यक्त’ व्हायचा अट्टहास?
मला ब-याचदा असं वाटतं, की ‘न बोलायची कला’ आपल्याला साध्य व्हावी. अनेक गोष्टींवरची अनेक मतं, मतांतरं, विवाद, चर्चा या सगळ्या गोष्टी टाळता याव्यात... ‘काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही’ ही सिद्धी प्राप्त व्हावी. मिटून घ्यावं आतल्या आत स्वतःला... थंड, खोल गारवा...
मग कधीतरी, खूप काळानंतर, आपलाही शोध घ्यावासा वाटेल कुणाला तरी. आपली एकेक पाकळी उलगडत समजून घ्यावं, मग कोणीतरी आपल्याला. पोहोचेलच की कोणीतरी, कधीतरी आपल्याही गाभ्यापर्यंत. तोपर्यंत वेळ तसाच जाऊ द्यावा... एक शांतता पसरावी आजूबाजूला सगळीकडे. काहीतरी सुंदर पाहिल्यावर जी अनामिक हुरहुर लागते, तिचं व्यक्त होणं कळून यावं. त्यालाही आणि मलाही. शब्दांचा भडिमार नकोच मग. डोळ्यातल्या पाण्यानेही सांगून जावं बरंच काही. त्या वाहत्या पाण्यानेही स्तब्ध व्हावं एक क्षण. हातात धरलेल्या हातानेही मुकेपणाने लावावेत अर्थ. सूर्य जरासा मावळताना धरून ठेवावा आपल्या मुठीत... एकत्र... एकाच वेळी! या संकेतांनी बहरून येईल, ते खरं व्यक्त होणं... सापडेल आपल्याला?

स्पृहा जोशी

12 comments:

 1. Shearing karanyach tujhe thoughts Tu share kele ....kasal bharie.
  Actually koni tari majhyaparyant pohochalch nahi tar, hi satat watanari bhiti share karayala
  Pravrutt karate...kadachit.

  ReplyDelete
 2. शब्द नसते तर , शब्दांना दुहेरी पदर लाभून नेमक काय व्यक्त करायचा आहे/ व्यक्त होत आहे हा संभ्रमही झाला नसता.
  सगळेच मुके . मग वाद नाही . फक्त निसर्गाच ऐकायचं. त्याच्याशी व्यक्त व्हायचं .
  शब्द म्हणजे मृगजळ आहे . काही खर सांगत नाहीत . शब्दांपेक्षा डोळ्यातून व्यक्त होणारे भाव प्रामाणिक असतात ." समुद्र" मधील भास्कर सारखे . नंदिनी बद्दल वाटणारी काळजी, जिव्हाळा किती सहजपणे व्यक्त होतो . भावना प्रामाणिक असतील तर नक्कीच पोचतात प्रार्थनेसारख्या . Madam खूप सुंदर लिहता तुम्ही . ओघवत असत म्हणून खूप आवडत .

  ReplyDelete
 3. खूप छान लेख .
  कुणीतरी आपल्या गाभ्यात पोहोचावं ,आपल्याला जाणून घ्यावं किंवा आपण कुणालातरी इतकं खोलपर्यंत समजून घ्यावं यासाठी लागणारी basic गोष्ट आहे patience . आज एका click सरशी 'feelings' पाठवते आपली पिढी. वाट बघण्यातली मजाच हरवून बसलोय आपण कुठेतरी . तू म्हटल्याप्रमाणे 'न बोलायची कला' साध्य होण्याइतका ठेहेराव जेव्हा आपल्यात येईल नं, तेव्हा मग शब्दांच्या भडिमाराची गरज पडणार नाही .

  ReplyDelete
 4. Thanks Yashodip, Infinity and Sneha :)

  ReplyDelete
 5. अप्रतिम लेख स्पृहा,

  माणसाला हि मन असत त्या मनाला हि कधीतरी वेदना होतात मग त्याच वेदनांना कुठे तरी हलकासा आधार मिळावा कदाचित या साठी ते हुरहुरत असेल अन या आधार साठीच ते कुनीतर शोधत असेल

  ज्याला मनावर प्रभुत्व मिळवता आला त्याला या सर्वांची गरज भासत नसावी पण हे सर्वांनाच जमत अस हि नाही कारण ते मन असत कुणाच चंचल तर कुणाच कठोर तर कुणाच हळव
  - विक्रांत

  ReplyDelete
 6. खूप छान लेख आहे! मला वाटतं, आपल्या सभोवताली लोकांची जशी गर्दी वाढत जाते, तसं आपसुकच आपल्यावरील बंधनेही वाढत जातात. तेंव्हा आपला ब्लॉग फारसं कोणी वाचत नाही, या गोष्टीचंही मला अगदी नकळतच मनापासून समाधान वाटतं. कारण मी काय लिहावं? आणि काय लिहू नये? लोकांना काय आवडेल? असा विचारच मनाला स्पर्श करत नाही.

  यावर दुसरा उपाय असा की, आपल्याला जे वाटतं, ते लिहित राहायचं, आपल्या फॉलोअर्सची आजिबात परवा करायची नाही. तेंव्हा कालपरत्वे जे समविचार लोक असतात, तेच केवळ आपल्यासोबत उरतात. समविचारी लोक जरी संख्येने कमी असले, तरी त्यांच्यामध्ये वावरताना आपल्या मनाची, आपल्या विचारांची कुचंबना होत नाही, तर उलट आपणास अधिक उर्जा प्राप्त होते.

  ReplyDelete
 7. Thanks Vikrant, Rohan, Rupali :)

  ReplyDelete
 8. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 9. खूपच छान स्पृहा. 'न बोलण्याची कला' मुळात हा विषयच किती वेगळा आहे. काही अंशी मौनाच्याही पलीकडचा. खर तर आपण स्वतःलाच कळलेलो नसतो आणि उगीचच जगामागे धावत असतो आणि इथे तर जग आपला शोध घेणार म्हणजे किती विलक्षण आहे ना.. 
  खूप धन्यवाद इतका छान विचार आम्हाला शेअर केल्याबद्दल..

  ReplyDelete
 10. अप्रतिम लेख..! खरचं प्रत्येक माणसाला आपल मन मोकळ करायचं व्यासपीठ किवा व्यक्तिमत्व हवं असतं..! त्याच मन नेहमी त्या व्यासपीठाचा शोध घेत असत..! पण योग्यवेळ, व्यक्ति किंवा व्यासपीठ मिळाल तर ठीक.. नाही तर त्याच्या भावनांच हास होवुन जात

  ReplyDelete
 11. Khup sundar lekh. Manala bhavun jatat tumcha kaangoshti. Apratim 👌👌👌

  ReplyDelete