Wednesday, February 16, 2011

होडी

करडा समुद्र,
पार दूरवर दिसणारा 
जमिनीचा एकच तुकडा,
पिवळट कोरडा चंद्र
नुकताच झोपून उठल्यासारखा..
लाटासुद्धा हिरवट निळ्या,
काडेपेटीची काडी कशी 
क्षणभर लकाकते तशा..
एक होडी पुढे पुढे येतेय, 
बंदरात नांगर टाकतेय,
आपला आधीचा वेग 
काबूत आणायचा प्रयत्न करतेय.
या चिखला-मातीच्या गाळातून
सरकण्यासाठी आधीचा वेग विसरणं
भाग आहे तिला.
आधी खूप त्रास,वेदनाही.
आधी घाबरली होडी थोडीशी. 
पण मग हळूहळू जाणवणारी 
किनाऱ्याची हवा,सुगंधी.
आतून आवडणारी..
एक थंडगार,निळं आलिंगन..
होडी कल्पनेतही मोहरली! 
त्याच आवेगात भान सुटलं,
एका बर्फाच्या कड्याला टोक घासलं..
होडीत आता निळाशार प्रपात,
प्रचंड आवेगाने धावत आत,
पण बुडतानासुद्धा होडीला
आता भीती वाटत नाहीये,
बुडण्याचं दुःख तर त्याहून नाहीये;
मूकपणे तिने झोकून दिलंय स्वतःला
तिच्या उत्कट समर्पणात..
आता तिथल्या लाटांना
रोज एक धडधड ऐकू येते,
तिच्या आणि सागराच्या 
हृदयाची.. 

-स्पृहा.
    

Wednesday, February 9, 2011

'मोठं' होणं.

'मोठं' होणं म्हणजे नेमकं काय??
डोळ्यांमधली चमक हरवत जाणं,
सौंदर्याचं लेणं हळूहळू झिजत जाणं,
जाणाऱ्या प्रत्येक क्षणासोबत
कणाकणाने विकल होत जाणं,
की एका एका गात्रासोबत स्वतःच
नकळत विझत जाणं;
'मोठं' होणं म्हणजे नेमकं काय?
तुरुंगातल्या कैद्यासारखी अशी
एकाकी होरपळ,
म्हणजे 'मोठं' होणं..?
की कोणत्याही बदलांना स्वीकारण्याची
तयारी नसलेल्या शरीर-मनाची
सतत समजूत काढून
येणारी मरगळ,
म्हणजे 'मोठं' होणं..?
खरंच 'मोठं' होणं म्हणजे नेमकं काय??
जाणवत राहतात सतत, 
आतून गोठलेल्या भावनांचे
विलग होत जाणारे पदर,
आणि जाणवत राहतात
अखेरचे उरलेले काही श्वास
वार्धक्याच्या शेवटच्या पायरीवर..
जिवंतपणीच भुतं होऊन
स्वतःच स्वतःला घाबरत
जगत राहतो आपण,
'मोठं' होऊन;
किंवा अशा जगण्यालाच घाबरत
हरत हरत मारत राहतो आपण,
'मोठं' होऊन..!!
तारुण्याच्या उंबरठ्यावर,
बालपणाची शेवटची पायरी ओलांडताना
'मोठं' व्हायचं,असं स्वप्न होतं.
'असं' व्हायचं,हे नव्हे!
आता अधाशी डोळ्यांनी
आपलाच भूतकाळ पहायचा,
आणि 'मोठे'पणाच्या भीतीने
झरणारे डोळे चटकन पुसून टाकायचे,
'लहानपण' म्हणजे नेमकं काय??
याचा विचार करत..!!

-स्पृहा.

Friday, February 4, 2011

या पुढच्या क्षणात.

या पुढच्या क्षणात,
सगळं काही विस्कटलेलं असेल 
आणि ते विस्कटणारे हात
माझेच असतील;असायला हवेत!
मन सांगतंय.'थोडं थांब;
उशीर होऊदे..अजून जरासा..'
खरं आहे..संपवायचंच तर आहे सगळं
मग असा कितीसा फरक
पडणार आहे एक-दोन क्षणांनी!
पण मध्येच मनच म्हणतं,
पापणी लवायच्या आतच
उरकून जाऊ दे काय ते.
दोन्हीपैकी बरं काय..??
याचा निर्णय मीच घ्यायचा एकटीने!
मृगजळामागे किती दिवस धावतेय.
शांततेच्या शोधात एक एक दिवस ढकलतेय.
खरयापासून लांब,लांब पळतेय.
पुढचा रस्ता..धुक्यात हरवताना बघतेय.
सगळं असंच संपायचं होतं,
तर मग 'ती' सुरुवात तरी का?
धुक्यात हरवायचंच होतं,
तर मग 'ती' पायवाट तरी का?
हे विसकटणं थांबवायचा रस्ता
कधीच भरकटलाय..
मग कशासाठी हा
वेळ काढण्याचा खेळ?!
हा अर्धा मांडला डाव
मला एकदाच विस्कटू दे,
साऱ्या खिडक्या उघडू दे,
या वादळाला मला
आपण होऊन बोलावू दे...
स्वतःच विस्कटते आहे मी;
पण माझीच मला मदत करू दे,
हे मृगजळ माझं,मलाच
या पुढच्या क्षणात संपवू दे..!!

-स्पृहा.

Thursday, February 3, 2011

एकटी मी..

एकटी मी शांत आता
नाही कुठली वेदना,
वेदनेच्या पार मी,
ही आगळी संवेदना..

उसवलेली क्षीण नाती 
सांधणे आता नको
हरवलेले शब्द हे 
अन हरवलेली भावना!

सोनचाफा देह सारा,
गंध ओलेता मुका;
मी मुक्याने मांडली 
होती तुझी रे प्रार्थना.

खोल गहिऱ्या काळडोही 
सूख माझे शोधिले मी,
दुःखही लाजे अताशा
पाहुनी ही साधना..!!

-स्पृहा.