Friday, September 30, 2011

नैतिकतेचे डांगोरे

'गॉसिपिंग'  हा आपला राष्ट्रीय आवडता छंद आहे. कोणीही उठून कोणाबद्दलही  काय वाट्टेल ते बोलू शकतो. 'भाषणस्वातंत्र्य' ही तर आपल्या लोकशाहीने आपल्याला दिलेली खास देणगी आहे. जिचा चोख फायदा घेत आपल्या दुधारी जिभेचे धारदार दांडपट्टे सतत चालूच असतात. बरं आपल्याला सगळ्या विषयांतलं सगळं कळतं, आणि त्यावर अजिबात लायकी नसतानाही ठाम मतप्रदर्शन करण्याचा आपल्याला नैतिक अधिकार आहे असा एक विशेष समज आपल्या मनीमानसी रुजलेला आहे. त्यामुळे सचिनच्या सेंच्युरीपासून ते कतरीनाच्या बिकीनीपर्यंत, आणि अण्णा हजारेंच्या उपोषणापासून ते ओसामा बिन लादेनपर्यंत कुठल्याही गोष्टीवर सर्व लहानथोर प्रचंड अधिकारवाणीने बोलत असतात. त्यातून 'नीतिमत्ता' हे तर राखीव कुरण! तिथे जर कोणी घसरलं, की मग तर समस्त संस्कृतीरक्षक बाह्या सरसावून उभे ठाकलेच. नमनाला एवढं घडाभर तेल ओतण्याचं कारण म्हणजे, सध्या चालू असलेला (माझ्या मते) नॉनसेन्स वितंडवाद.'मणिपूरची लोहकन्या' म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या इरोम शर्मिला हिने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये जाहीरपणे सांगितलं, की "डेझमंड कुटीन्हो नावाच्या गोव्यात जन्मलेल्या ब्रिटीश लेखक, सामाजिक कार्यकर्त्यासोबत माझं अफेअर चालू आहे." झालं. वादाचा प्रचंड धुरळा उडाला. तिचे विरोधकच  नाही, तर समर्थक सुद्धा हडबडले. ही बातमी खरी नसून ती शर्मिलाविरुद्ध कसलीतरी भयानक 'स्टेट कॉन्स्पिरसी' आहे, असंही बोलून झालं. 'एलिट' वर्गाने नेहमीप्रमाणे "तिच्या आयुष्यात तिने काय करावं हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे", असं म्हणून सोयीस्करपणे विषय झटकून टाकला. म्हणजे यांच्या 'ड्रिंक पार्टीज' मध्ये चघळायला विषयही झाला, आणि सामान्य मध्यमवर्गीयांच्या नीतीमत्ताविषयक कचकड्याच्या कल्पनांना भूकंपाचे धक्केही बसायला नकोत !
माझ्या मनात थैमान चालू आहे ते वेगळ्याच विचारांनी. काय झालं, समजा शर्मिलाला बॉयफ्रेंड असला तर? काय फरक पडतो तिचं कोणाबरोबर अफेअर असलं तर? या एका कारणामुळे तिचं आजपर्यंत असलेलं सगळं कर्तृत्व लगेच डागाळलं? गेली दहा वर्ष ही एकटी बाई कोणतेही मिडिया स्टंट न करता मणिपूर मधून 'आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स ऍक्ट (AFSPA) हा अन्यायकारक कायदा रद्द व्हावा म्हणून उपोषण करते आहे, सरकार नामक अजस्त्र राक्षसाशी एकटी हिंमतीने झुंजते आहे, अनन्वित छळाला सामोरी जाते आहे, तिच्या कार्याच्या जोरावर तिथल्या लोकांच्या गळ्यातली ती ताईत बनली आहे, ही सत्य परिस्थिती केवळ वरच्या एका घटनेमुळे आपण नाकारायची??

तिचं आयुष्यभराचं सगळं कर्तृत्व या एका घटनेने कस्पटासमान ठरवायचं?? का कोणाला तिच्या बचावासाठी हे म्हणण्याची गरज पडावी, की "अहो, हे कसं शक्य आहे, कारण शर्मिला तर कडक बंदोबस्तात पोलीस पहाऱ्यात होती. हॉस्पिटलमध्ये सुद्धा तिच्यावर इतकी कडक नजर होती, की तिचे कुटुंबीयही तिला भेटू शकत नसत. मग हे अफेअर वगैरे कसं शक्य आहे?" का वेळ यावी हे बोलायची? किंवा हे क्लॅरिफिकेशन घाईघाईने द्यायला लागावं, की "ते दोघं आता 'एंगेज्ड' आहेत, त्यामुळे अफेअर करून गमावलेलं(?) सिव्हील सोसायटी मधलं स्थान आता शर्मिलाला परत मिळालं आहे!!!" कुठल्या नैतिकतेचे डांगोरे पिटणं चालू आहे आपलं? बाकी सगळं सोडून देऊ, पण एक स्वतंत्र 'व्यक्ती' म्हणून शर्मिलाचा 'प्रेमात पडण्याचा अधिकार' हिरावून घेण्याचा आपल्याला काय अधिकार आहे?तिचं 'बाईपण' ही गोष्ट आणखीनच गुंतागुंतीची करून ठेवतं. कारण कुठल्याही 'आदर्श स्त्री'ला आपल्याकडे 'देवी माँ' होऊनच राहावं लागतं, जगावं लागतं. तीही कालीमातेसारखी कठोर नाही, तर मध्यमवर्गीय पितृसत्ताक मानसिकतेला आवडेल, झेपेल, पचेल इतकीच साधी, सोज्वळ, पतिपरमेश्वरपरायण 'सीता' म्हणून. त्यामुळे ही मणिपूरची लोहकन्या शर्मिला; शक्ती, दया, क्षमा, शांती, करुणा, आणि त्यागाचं प्रतीक असणारी शर्मिला, हिने प्रेमाबिमासारख्या क्षुद्र मानवी भावनांमध्ये अडकून कसं चालेल? तिने असा विचारही करणं, ठार चुकीचंच नाही का! अब्रह्मण्यम!! आपल्याकडच्या चॅनल्सनाही त्यांचा TRP वाढवायला, हे असले विषय चघळायला बराच वेळ असतो, त्यामुळे त्यांनी तर साधारण, "जिला आपण सर्व आदर्श मानतो, अशा एका कमकुवत मनाच्या स्त्रीने आपल्या भाबड्या निष्ठावंतांची केलेली घोर फसवणूक..!!" इतक्या हीन पातळीला शर्मिलाचा विषय आणून ठेवलाय. एका पेपरने तर 'शर्मिलाला तिच्या प्रियकराने अॅपलचं मॅकबुक भेट दिलं' अशीही बातमी छापली. पण दुर्दैवाने कुठल्याही पेपरने त्यावर, 'सो व्हॉट?' , 'मग काय?' असा स्टॅंड घेतलेला नाही. आपल्याकडे राज्यकर्ते आणि सेलिब्रिटीज यांची असंख्य वेळा घडणारी- तुटणारी अफेअर्स आपल्याला चालतात. त्या गोष्टीवर त्यांचं 'ग्लॅमर' आणि आपली 'क्रेझ' सहज पांघरुण घालते. मग हाच न्याय त्या मणिपूरच्या 'आयर्न लेडी' ला का नाही? तिच्यावर 'नीतीमत्ताहीन' असल्याचा शिक्का मारण्यापूर्वी हा विचार का नाही? 'प्रेमात पडण्याचा अधिकार' तिच्या नशिबी का नाही..??!!


Sunday, September 11, 2011

आनंद

सकारात्मकता... एकदम केवढा मोठ्ठा शब्द आला न सुरुवातीलाच.. हा मूल्यशिक्षणाचा ता(त्रा)स चालू आहे का, असंही मनात येऊन गेलं असेल! पण शाळेत हा शब्द कानावर पडण्याच्या, आणि त्याचा कंटाळा येण्याच्या खूप आधी मला हे शिकवलं एका साध्या  पिक्चरने...'आनंद' ने!! तेव्हा त्यातलं सगळंच कळलं होतं अशातला भाग नाही.. पण 'आपण आनंदी राहून दुसऱ्यांना आनंदी  ठेवणं' या कल्पनेतली गंमत जाणवली होती.. पुढे मंगेश पाडगावकरांची 'सांगा कसं जगायचं, कण्हत कण्हत की गाणं म्हणत' ही कविता वाचताना, हा 'आनंद सेहगल' च आपल्याशी बोलतोय, असा साक्षात्कार झाला. आणि एखादा जुना मित्र भेटावा तितका आनंद झाला मला..
मुळात, हल्ली जिथे तिथे ज्याच्या त्याच्या तोंडी 'मला टेन्शन आलंय, फ्रस्ट्रेशन  आलंय' हे इतकं सहज ऐकू येतं.
अरे यार, काय रडेपणा चाललाय? ज$$$रा विचार करा, तुम्ही एका गॅलरीत उभे आहात, खालून सांडपाण्याचं गटार वाहतंय, आणि आकाशात एक छानसा लुकलुकणारा तारा आहे; तर तुम्ही आनंदाने तारा बघणार,का गटार बघून तोंडं वेंगाडणार!! चॉइस तुमच्या हातात असतोय की राव !!


कदाचित याच पॉझीटीव्ह भूमिकेमुळे दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जींनी 'आनंद' सारखा मास्टरपीस बनवला असेल. त्यांना साथ मिळाली ती गुलजार, योगेश, सलील चौधरी यांसारख्या प्रतिभावंतांची आणि त्याचबरोबर गुणी अभिनेत्यांची.. सतत बोलणाऱ्या, रसरसून आयुष्य जगणाऱ्या आनंदची भूमिका सुपरस्टार राजेश खन्ना अक्षरशः जगलाय. 'जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नही!' असं सांगणारा आनंद मनाला स्पर्श करून जातो, तो उगाच नाही! चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमला खरंतर आपल्याला कळतं की आनंद मरण पावला आहे. पण तरीसुद्धा प्रत्येक दृष्यागणिक आपण त्याच्या प्रेमात पडत जातो, आणि तो जिवंतच राहणार असेल, तो मरूच नये अशी मनातल्या मनात प्रार्थना करत राहतो.. तो गेल्यानंतरचा 'बाबूमोशाय' अमिताभचा आक्रोश हा त्याच्या एकट्याचा नसतो, तर पाणावलेल्या डोळ्यांनी मूकपणे आपल्याही मनात तेच भाव दाटून आलेले असतात..
'आनंद' ची सगळी कमाल हे त्यातील पात्रं ज्या भाषेत बोलतात, त्यात आहे असं मला वाटतं. "जब तक जिंदा हूँ,तब तक मरा नहीं. जब मर गया, साला मैं ही नहीं; तो फिर डर किस बात का!" अंगावर प्रत्येक वेळी काटा येतो हे ऐकताना. आणि पिक्चरच्या सुरुवातीला आकाशात दूर हरवत जाणाऱ्या फुग्यांच्या पार्श्वभूमीवर ऐकू येणारं येणारं "जिंदगी कैसी है पहेली" हे गाणं??? 'आनंद' चं स्पिरीट सांगणारं हे गाणं, खरंतर शाळांमधून कविता म्हणून शिकवायला हवं! मग मूल्यशिक्षणाचे ओव्हरडोस नसले तरी चालतील..

कारण कसं आहे, सकारात्मकता अशी डोस पाजून 'इंजेक्ट' नाही करता येत.. ती अंगात मुरवावी लागते, रुजवावी लागते.. 'आनंद सेहगल' सारखी! बाकी सगळं सोडून देऊ पण 'आनंद' मधून एक जरी गोष्ट आपण शिकलो न, तरी सगळं साधलं.." मरते मरते चेला गुरु को जीना सिखा गया, दुख अपने लिये रख, आनंद सबके लिये...!!!!"Tuesday, September 6, 2011

मोरया.

तूच माझी आई देवा, तूच माझा बाप
गोड मानुनी घे सेवा, पोटी घाल पाप
चुकलेल्या कोकरा या वाट दाखवाया
 घ्यावा पुन्हा अवतार बाप्पा मोरया..!!
दरवर्षी गणपती बाप्पाचं आगमन ही माझ्यासाठी स्पेशल गोष्ट असते.. आणि यंदा तर 'मोरया' मुळे हा गणेशोत्सव आणखीनच स्पेशल झाला माझ्यासाठी.. आज सर्व थरांतून या चित्रपटाला जे उदंड प्रेम मिळतंय, जो अमाप प्रतिसाद मिळतोय ही बाप्पाचीच कृपा नाहीतर काय..आज म्हणूनच मोरयाच्या आठवणी तुमच्याशी शेअर कराव्याशा वाटतायत..
गणपती ही बुद्धीची देवता..'मोरया' च्या अगदी सुरुवातीच्या मिटींग्स मध्येच जाणवत होतं की बाप्पाचा वरदहस्त असलेल्या अतिशय क्रिएटिव्ह लोकांसोबत आपण काम करतोय.. संगीतदिग्दर्शक म्हणून लोकांची कौतुकाची पावती मिळवून आता उत्तम दिग्दर्शक अशी ख्याती कमावणारा अवधूत गुप्ते, अप्रतिम स्क्रीनप्ले आणि संवाद लिहिणारा सचिन दरेकर, उत्कृष्ट छायाचित्रण करणारा राहुल जाधव, समजून उमजून जीव ओतून काम करणारे संतोष जुवेकर आणि चिन्मय मांडलेकर, अष्टपैलू गणेश यादव, ज्यांचं नाव घेताना आदरयुक्त प्रेम वाटतं असे, द ग्रेट दिलीप प्रभावळकर... नावं तरी किती घ्यायची... या सगळ्यांसोबत आपण काम करणार ही कल्पनाच मुळी खूप एक्सायटिंग होती. त्यामुळे शूटिंगचे सगळे दिवस हा एक आठवणींचा ठेवा बनून राहिला.
मुळात मला नेहमी पडणारे बरेच प्रश्न या चित्रपटात विचारले गेलेत..त्यामुळे आपण काहीतरी खूप आपल्या मनातलंच सांगतोय असं वाटत होतं.. स्क्रिप्टशी नातंच जुळून गेलं. गणपतीबाप्पा वर मनापासून प्रेम आहे माझं..त्यामुळे हा गणेशोत्सवाचा नाटकी झगमगाट का, कशासाठी, कोणासाठी? असं नेहमी वाटायचं. अचकट विचकट डान्स, डीजेचा ढणढणाट, पैशांची कोट्यानुकोटी उड्डाणे, केवढाले तरी सेट्स, या सगळ्यात एरवी खूप जवळचा असलेला बाप्पा हे दहा दिवसच आपल्यापासून दूर गेल्यासारखा वाटायचा.. 'मोरया' ने नेमका ह्याच भावनांना हात घातला. ''झगमग पाहुनिया पाठ फिरवून गेला,रोषणाई मध्ये देव माझा हरवून गेला..!!"
आणि त्याच्याच बरोबर हेही मोकळेपणाने मान्य करायला हवं की 'मोरया' करताना जाणवली साध्यासुध्या, भोळ्याभाबड्या गणेशभक्तांची, स्वयंसेवकांची, कार्यकर्त्यांची तळमळ. कुठलीही अपेक्षा नसते त्यांची, कुठेही झळकायचं नसतं त्यांना. ना कुठलाही 'क्रेडीट' हवं असतं. मोरया मध्ये संतोष आणि चिन्मय च्या कामाला लोकांनी डोक्यावर घेतलं, यात त्यांच्या अभिनयाला दाद तर होतीच; पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, त्या मनोज आणि समीर मध्ये त्यांनी स्वतःला पाहिलं. या दोघांमध्ये त्यांनी आपलंच प्रतिबिंब पाहिलं!
मला अतिशय आवडणारं 'मोरया' मधलं पात्र, म्हणजे कामत काका.या व्यक्तिरेखेला दिलीप काकांनी वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. एका प्रसंगात कामत काका म्हणतात, "अमुक अमुक राजा पावतो, म्हणून त्याच्या दर्शनासाठी रांगा लावता; आणि उजव्या सोंडेच्या गणपतीला घाबरता..अरे ही काय श्रद्धा म्हण्यची!!" किती खरं आहे हे.. सध्या रोज उघड्या डोळ्यांनी पेपर वाचत असाल, बातम्या पाहत असाल तर, तुम्हालाही हे भयाण, दाहक वास्तव नक्कीच जाणवलं असेल, हो ना?
लोकमान्य टिळकांनी जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली, तेव्हाचा आणि आताचा उत्सव यात जमीन-अस्मानाचा फरक पडलाय. आपण सगळ्यांनीच हे मान्य करायला हवं. सगळं बदललं, छोटे छोटे कार्यक्रम, स्नेहसंमेलन, फुलांची आरास, छोटीशी गोजिरवाणी मूर्ती.. आता भव्य मंडपांमध्ये राजकीय नेत्यांचे बॅनर्स आले, जुगाराचे अड्डे आले, दारूच्या बाटल्या आल्या.. मांगल्य, पावित्र्य हे नुसते शब्द म्हणून उरलेत.. एकाच गोष्ट बदलली नाही.. ती म्हणजे, मगाशी म्हटल्याप्रमाणे कार्यकर्त्यांची तळमळ, त्याचं निखळ प्रेम आणि त्यांची निरागस भावना... आशेचा किरण म्हणूनच वाटल्यावाचून राहत नाही..
'मोरया' करताना हे सगळं परत परत जाणवत राहायचं, आणि या इतक्या छान प्रोजेक्टचा आपण लहानसा का होईना पण एक भाग आहोत, या कल्पनेनेच खूप आनंद व्हायचा.. शेवटी सगळ्याचा कर्ता-धर्ता तोच.. त्याची अशीच कृपादृष्टी राहो एवढीच त्या विघ्नहर्त्या गणेशाजवळ प्रार्थना..
"गणाधीशा, भालचंद्रा, गजवक्रागणराया
     वक्रतुंडा, धुम्रवर्णा, गणपती बाप्पा मोरया...!!!!"

Sunday, September 4, 2011

माझी मुलाखत.. तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करताना खूप आनंद होतोय!
'मोरया' च्या निमित्ताने जे उदंड प्रेम दिलंत, जो प्रतिसाद दिलात त्यासाठी मनापासून आभारी आहे. आपलं असंच प्रेम आणि आशिर्वाद सतत पाठीशी राहोत !!!
- स्पृहा.