Sunday, May 29, 2011

आभाळ

गच्च काळ्या ढगांनी भरलेलं काळंकुट्ट आभाळ.
भीती वाटते त्याची कधी कधी.
सारं आसमंतच व्यापून टाकलेलं असतं त्याने.
पळणार तरी कुठे आपण त्याच्यापासून?
त्याने डोळे उघडले तर लक्ष लक्ष एकदाच?
फोडून काढलं तर पावसाच्या चाबकाने?
विजेचा तिसरा डोळा भयकारी रागामध्ये
आगीत लपेटून टाकेल आपल्याला..!!
जीव मुठीत धरून आपलं क्षुद्र जगणं जगत राहणं..
आपल्या हातात एवढंच..
सटवाई सुद्धा त्यालाच फितूर!
त्याच्याच अंगणात आश्रिता सारखी..
त्याच्या डोळ्याला डोळा भिडवायची काय,
मान वर करून पाहण्याची सुध्धा हिंमत नाही..
सृष्टीच्या आतलं काहूर जाणवत असतं खरंतर..
तिची इच्छा असते,आपला संवाद घडावा आभाळाशी..
पण तीही मुक्याने हे कडू सत्य पचवत राहते..
आतले कढ आताच दाबत राहते..
हळूहळू अंतर वाढतं,वाढतच जातं..
क्रांती करायला लागतं मन
वाढत्या वयानुसार.
आभाळाचं अस्तित्त्वच झुगारून द्यायला लागतं..
धाडस करतं त्याच्या नजरेला नजर देण्याचं,
ताठ मानेने त्याच्या समोर उभं राहण्याचं..
आता हळूहळू आभाळही म्हातारं व्हायला लागतं.
वयानुसार अनुभवाने निवळायला लागतं..
अशीच कधीतरी नजर जेव्हा आभाळावर जाते,
काळेभोर क्रुद्ध ढग निघून गेलेले असतात.
आभाळाच्या वृद्ध नजरेत वेगळेच भाव असतात.
शांत निरभ्र आभाळ तेव्हा कौतुकाने पाहतं,
काहीतरी आपल्या मनात उगा दाटून येतं.
हात पसरून,वय विसरून आपण मोठे होतो,
थकलेल्या आभाळाला मायेने कवेत घेतो..
आभाळाच्या डोळ्यांत तेव्हा आनंदाश्रू दाटून येतात;
सुरकुतलेल्या सृष्टीचे कातर क्षण जागे होतात..!!!

- स्पृहा.

Saturday, May 7, 2011

मालिका.. जुन्या..तरीही ताज्या!!

तुम्हाला एक सिक्रेट सांगू??हल्ली मला टीव्ही वर सध्या सुरु असलेल्या मालिका बघण्यापेक्षा जुन्या मालिकांचा री-टेलिकास्ट बघण्याचा नाद लागलाय!!!श्रीकृष्णा,किंवा महाभारत हे खूप आवडीने बघते मी हल्ली..'रामायण' सुरु होती तेव्हा मी खूपच लहान होते..'लोकांनी टीव्हीची पूजा करणं' या अशा आख्यायिकाच मी ऐकल्या आहेत..पण 'महाभारत युगा'ची मात्र मी साक्षीदार आहे!!पुनीत इस्सार चा क्रूर पण तरणाबांड दुर्योधन,रूपा गांगुलीची लांबसडक,काळ्याभोर केसांची रुपगर्विता द्रौपदी,पंकज धीरचा धीरगंभीर कर्ण...आणि सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती...नितीश भारद्वाजचा श्रीकृष्ण...मी रविवारची आतुरतेने वाट बघण्याचं एक कारण होतं,महाभारत...टीव्हीला डोळे चिकटवून बसलेली असायचे मी..मोठी झाल्यावर जेव्हा 'युगंधर' कादंबरी वाचली,तेव्हा श्रीकृष्ण म्हणून नितीश भारद्वाजचाच चेहरा दिसला प्रत्येकवेळी...इतकं मनात बसलंय 'महाभारत'!!! पण खरंच सध्याचे काही बिनडोक रिअॅलिटी शोज आणि आचरट फॅमिली ड्रामे पाहण्यापेक्षा मला ते खूपच सुखावह वाटतं..
'फ्रेंड्स' नावाची एक अप्रतिम सिरीयल..हे नाव वाचून आत्ताही तुमच्यापैकी काही जणांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं असेल..ती कधीही चालू असेल न,तरी माझ्या हातातला रिमोट(ज्याचं 'सतत चॅनेल बदलणं' हे काम इतर वेळी सतत चालू असतं!!)अक्षरशः कोणीतरी संमोहित केल्यासारखा गळून पडतो..त्या पात्रांबरोबर मी त्यांच्या आयुष्यात शिरते..जोए,मोनिका,फिबी,रेचल,रॉस आणि शॅन्डलर ..मॅड,मॅड,मॅड माणसं सगळी!!!! 'फुल हाउस' नावाची अशीच एक बहारदार कौटुंबिक मालिका होती पूर्वी..आणि 'कौटुंबिक'असूनही ती 'बहारदार'होती हे नवल!!! इतकं ताजं झाल्यासारखं वाटतं त्यांना पाहताना.. तो खरेपणा,आयुष्य खऱ्या अर्थाने 'जगण्या'ची वृत्ती खूप जवळची वाटते..त्यांचे प्रश्न फार गंभीर नसतात,यश खूप मोठ्ठं नसतं.. त्यांचा 'दस करोड का बिझनेस' नसतो,की त्यांना 'बिखरे हुए परिवार को एकसाथ करके दिखाना' असलं शिवधनुष्य पेलायचं नसतं.. त्यातल्या शहरी हिरोईनला नायकाशी लग्न करण्यासाठी त्याच्या गावच्या आजीला पटवायचं नसतं,किंवा भंपक डान्स शोज मध्ये जाऊन नृत्य केल्याचा अभिनय करायचा नसतो!!! थोडक्यात काय तर ही सगळी माणसं अत्यंत खरी,हाडामासाची वाटतात..ते 'अभिनय' करतायत असं वाटतच नाही..गुदगुल्या करत,कधी खुदूखुदू,कधी खळखळ,तर कधी खोखो हसवत राहतात ते आपल्याला..
आपल्याकडे एक 'देख भाई देख' नावाची सिरीयल लागायची आठवतंय?? धमाल होती नुसती..शीर्षक गीत घोळायला लागलं की नाही लगेच डोक्यात?? 'साराभाई व्हर्सेस साराभाई' ने अशीच मजा आणली होती काही दिवसांपूर्वी.. आणि श्रीयुत गंगाधर टिपरे???या सिरीयलचं री-टेलिकास्ट एकदाही चुकवलं नाही मी..ते 'टिपरे' कुटुंबीय माझे नातेवाईक असल्याइतकी जवळीक वाटते मला त्यांच्याबद्दल,अजूनही.. आपल्याला दुर्दैवाने बुनियाद,तमस या मालिका नाही बघायला मिळाल्या..काय बहार येईल यांचं री-टेलिकास्ट झालं तर..गोट्या,बोक्या सातबंडे पुन्हा भेटायला लागले तर किती लहानगे चेहरे खदखदून हसतील..उत्तम मालिका म्हणजे मी फक्त विनोदी मालिकांबद्दल बोलतेय,असा गैरसमज प्लीज करून घेऊ नका..झोका,प्रपंच,पिंपळपान,मेघ दाटले ...किती सुंदर होत्या या मालिका..'नक्षत्रांचे देणे' ने नकळत 'अभिरुची' म्हणजे काय ते शिकवलं.आम्ही सातवी-आठवीत असताना 'दे धमाल' नावाच्या मालिकेत काम करायचो..इतकी गंमत वाटते,आजही जेव्हा लोक या सिरीयलचा री-टेलिकास्ट आवर्जून बघतात आणि त्यातल्या निरागसतेला आजही वाखाणतात.
कदाचित या मालिका मला इतक्या आवडतात,कारण त्या मला माझ्या लहानपणीच्या आठवणीत घेऊन जातात..किंवा कदाचित त्या मालिकांशी माझे काही खूप सुंदर क्षण निगडीत आहेत..प्रत्येकाची ही 'लिस्ट' वेगवेगळी असू शकेल..पण एक मात्र खरं; मालिकांपेक्षा जाहिरातीच बघाव्याशा वाटणाऱ्या आत्ताच्या दिवसांमध्ये या काही मालिका पाहणं,किंवा त्यांच्या आठवणीत रमून जाणं हे जास्त आनंददायी ठरतं..आणि यातली सगळ्यात छान गोष्ट म्हणजे हे मनोरंजन TRP च्या भीषण तागडीत तोललं जात नाही!!!!

Monday, May 2, 2011

शोकपर्व


“मृत्यू..मरण..शब्द वाचूनही धडकी भरते. सतत ती कल्पना टाळत जगत असतो आपण. आपल्या खूप जवळच्या एखाद्या व्यक्तीला कायमचं हरवून बसणं ही अतिशयच अवघड गोष्ट आहे. मृत्यूची जरी अगदी आधी कल्पना असली, आपलाच एखादा अवयव शरीरापासून तुटल्यासारखं मन कळवळत राहतं.पण एका क्षणी मात्र अपरिहार्यपणे आपण मनाला समजावतो..हळूहळू वस्तुस्थिती स्वीकारायला लागतो..जाणारा काळ मनावर फुंकर घालेल,दुःख्खाची धार बोथट होईल अशी आशा करत राहतो..पण जरा कुठे सावरावं,तर येऊन धडकतात 'दिवस'.आणि त्याहीपेक्षा आपला शोक कसा आणि कुठे व्यक्त करावा याचं जराही तारतम्य नसलेली माणसं. समोरच्याचं दुःख्ख किती हळवं आहे, किती नाजूक..त्याच्या अतिशय खाजगी भावनांची कदर करणं तर दूरच,त्यांची चिरफाड करायला तयार असतात या महान व्यक्ती..

अर्थात,एकुणातच आपल्याकडे 'खाजगी'पणा,प्रायव्हसी म्हणजे 'काहीतरी भयानक' अशीच समजूत असते. 'भावना' म्हणजे तर सार्वजनिक प्रदर्शनाचीच गोष्ट!! छाती पिटून रडला नाहीत,तर तुम्ही शोक करताय,तुम्हाला खरंच दुःख्ख झालंय हे लोकांना कसं कळणार!!! आरडाओरडा, अश्रुपात नसेल तर तुमचं गेलेल्या व्यक्तीवर प्रेमच नाही मुळी!! आलेला प्रत्येक माणूस बारकाईने तुमच्या आरपार बघत असतो. आलेल्या प्रत्येकाने सांत्वनपर मिठी मारल्यावर प्रत्येकवेळी जेव्हा तुम्ही रडत नाही,तेव्हा चारीबाजूंनी भुवया उंचावलेल्या दिसतात.."जळलं मेलं लक्षण..डोळ्यांत एवढ्या वेळात पाण्याचा टिप्पूस सुद्धा नाही..काळीजच दगडाचं हो!!"असे कुजबुजते उद्गार नाही लक्ष द्यायचं म्हटलं तरी कान चिरत आत घुसतात..
अंत्यविधींसाठी जमलेले नातेवाईक जे दुःख्ख वाटून घेण्यासाठी आलेले असतात,ते थेट हिंदी सिरीयलमधल्या 'दुष्ट सासू-खाष्ट नणंद' बनतात..त्या प्रसंगातही 'अजून चहासुद्धा दिला नाही' असं म्हणत,लोकांच्या कुचेष्टा करत स्वतःतच मग्न असतात.. भावनांची याहून जास्त क्रूर थट्टा काय असणार?? ...सांग; सांग न...!!!"

...माझी एक खूप जुनी मैत्रीण माझ्याकडे तिचं मन मोकळं करत होती...तिचे लाडके बाबा गेल्यानंतर पहिल्यांदाच हमसून हमसून रडत होती.. मी सुन्न झाले होते.. तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला आधार देण्याचा प्रयत्न करत राहिले..तिच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. तुमच्याकडे आहे???