Monday, May 2, 2011

शोकपर्व


“मृत्यू..मरण..शब्द वाचूनही धडकी भरते. सतत ती कल्पना टाळत जगत असतो आपण. आपल्या खूप जवळच्या एखाद्या व्यक्तीला कायमचं हरवून बसणं ही अतिशयच अवघड गोष्ट आहे. मृत्यूची जरी अगदी आधी कल्पना असली, आपलाच एखादा अवयव शरीरापासून तुटल्यासारखं मन कळवळत राहतं.पण एका क्षणी मात्र अपरिहार्यपणे आपण मनाला समजावतो..हळूहळू वस्तुस्थिती स्वीकारायला लागतो..जाणारा काळ मनावर फुंकर घालेल,दुःख्खाची धार बोथट होईल अशी आशा करत राहतो..पण जरा कुठे सावरावं,तर येऊन धडकतात 'दिवस'.आणि त्याहीपेक्षा आपला शोक कसा आणि कुठे व्यक्त करावा याचं जराही तारतम्य नसलेली माणसं. समोरच्याचं दुःख्ख किती हळवं आहे, किती नाजूक..त्याच्या अतिशय खाजगी भावनांची कदर करणं तर दूरच,त्यांची चिरफाड करायला तयार असतात या महान व्यक्ती..

अर्थात,एकुणातच आपल्याकडे 'खाजगी'पणा,प्रायव्हसी म्हणजे 'काहीतरी भयानक' अशीच समजूत असते. 'भावना' म्हणजे तर सार्वजनिक प्रदर्शनाचीच गोष्ट!! छाती पिटून रडला नाहीत,तर तुम्ही शोक करताय,तुम्हाला खरंच दुःख्ख झालंय हे लोकांना कसं कळणार!!! आरडाओरडा, अश्रुपात नसेल तर तुमचं गेलेल्या व्यक्तीवर प्रेमच नाही मुळी!! आलेला प्रत्येक माणूस बारकाईने तुमच्या आरपार बघत असतो. आलेल्या प्रत्येकाने सांत्वनपर मिठी मारल्यावर प्रत्येकवेळी जेव्हा तुम्ही रडत नाही,तेव्हा चारीबाजूंनी भुवया उंचावलेल्या दिसतात.."जळलं मेलं लक्षण..डोळ्यांत एवढ्या वेळात पाण्याचा टिप्पूस सुद्धा नाही..काळीजच दगडाचं हो!!"असे कुजबुजते उद्गार नाही लक्ष द्यायचं म्हटलं तरी कान चिरत आत घुसतात..
अंत्यविधींसाठी जमलेले नातेवाईक जे दुःख्ख वाटून घेण्यासाठी आलेले असतात,ते थेट हिंदी सिरीयलमधल्या 'दुष्ट सासू-खाष्ट नणंद' बनतात..त्या प्रसंगातही 'अजून चहासुद्धा दिला नाही' असं म्हणत,लोकांच्या कुचेष्टा करत स्वतःतच मग्न असतात.. भावनांची याहून जास्त क्रूर थट्टा काय असणार?? ...सांग; सांग न...!!!"

...माझी एक खूप जुनी मैत्रीण माझ्याकडे तिचं मन मोकळं करत होती...तिचे लाडके बाबा गेल्यानंतर पहिल्यांदाच हमसून हमसून रडत होती.. मी सुन्न झाले होते.. तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला आधार देण्याचा प्रयत्न करत राहिले..तिच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. तुमच्याकडे आहे???

8 comments:

 1. आजकालच्या जगात लोकं दिसण्यावर जास्त भर देतात....आणि हेच चुकतं...अश्या दुखद प्रसंगाच्या वेळेला कोण किती दुख दाखवतंय ह्यापेक्षा गेलेल्या माणसाची रिकामी कशी भरून काढता यावी यावर लक्ष द्यायला हवं....आणि तुझ्या मैत्रिणीला सांग....लोकं ही नेहमी अशीच राहणार...त्यांना बदलना कठीण आहे...त्यापेक्षा आपण आपल्या परिवारावर आणि जवळच्या व्यक्तीवर लक्ष दिला पाहिजे...आणि आपला परिवार आणि जवळच्या माणसांना बरोबर कळत नं दाखवता सुद्धा.....त्यांचा आणि आपला कायमचाच एक ऋणानुबंध असतो....

  ReplyDelete
 2. correct.. aahe.. kitihi jhala ..aani bhavnashunya rahnyacha praytna jari kela ..tari to ..NISHPHAL!!! kahi arth nahi... mala vachtana... janwla....ki ekhada patra swagat mhantay... aani awajahi tujha hota..tya patrala... mhanje ti tuch hotis...itka prabhavipane pohochala!! mast!! ;)

  ReplyDelete
 3. स्पृहा... माणूस जगण टाळू शकतो मरण नाही... मृत्यू नंतर काही दिवस हळहळ राहते पण नंतर राहतात फक्त तसबिरी...

  वपु म्हणतात' सांत्वनासाठी आजवर जगात कुणालाही शब्द सापडले नसतील.सांत्वन म्हणजे दुःखाच मूल.मूल आईपेक्षा मोठं कसं होईल?मूल मोठं व्हायला लागलं की आई आणखी मोठी व्हायला लागते.म्हणून,समजूत घालणारं कुणी भेटलं म्हणजे हुंदके वाढतात.हसता हसता माणूस एका क्षणात थांबू शकतो.दुःखातली व्यक्ती रडणं एका क्षणात विसरू शकत नाही.तेव्हा तू जा.बाहेर पड.एकांत शोध.तिथं तू तुझी डिग्री विसरशील.समजुतीला कुणी येणार नाही.शांत होण्याचे इशारे आतूनच उमटतील,मग आपोआप शांत होशील.’

  आणि मला वाटत प्रश्नाचं उत्तर तिला द्यायची काही गरज नाही ... कारण अनुभव सार काही शिकवतो... नाव ठेवणाऱ्या लोकांसमोर ताठ मान करून उभं राहण्याची जिद् सुद्धा हाच 'अनुभव' देतो... जिकडे प्रश्न त्याने तयार केला आहे तिकडे उत्तर पण तोच शोधेल आपण फक्त सोबत रहायचे सुख आणि दुखात...हातात हात घट्ट धरून... बस्स...

  ReplyDelete
 4. मृत्यू या संकल्पनेचा चुकीचा अर्थ स्वीकारल्याने असे घडते.

  ReplyDelete
 5. तुमची मैत्रिण म्हणाली ते शब्दश: खरं आहे स्पृहा! मृत्यू या बाबतीत भलेभले सुशिक्षितच जास्त अडाणी आहेत की काय अशी शंका येते!:(

  ReplyDelete
 6. मृत्यू मृत्यू म्हणजे तरी काय ??? माणसाचे शारीरिक अस्तित्व संपते तो डोळ्यांसमोर नसतो पण ,,, त्याने दिलेल्या संस्कारातून विचारांतून तो सतत आपल्या आठवणीत मनाच्या अगदी जवळ जिवंत राहातो ...
  आणि भावना तर आपल्या असतातात खूप खूप खाजगी ... त्या कशा व्यक्त करायच्या हा ज्याचा त्याचा प्रश्न पण हल्ली हे होतेय हे मात्र अगदी खरच, स्वत:ला सुशिक्षित म्हणवणार्यांचे बुरसतलेले विचार आणि बोथट भावना यांना तोंड देणॆ खरच अवघड असते ................

  ReplyDelete
 7. Nilesh..khoop chaan sangitlays tu..Mayuresh,Sharayu,Vinayak ji,Reshma..Agdi khara ahe tumhi mhantay te...

  ReplyDelete