Thursday, December 31, 2015

कविता त्यांची ऋणी...

माझ्या पहिल्या काव्यसंग्रहाला, "चांदणचुरा‘ला मंगेश पाडगावकर यांनी प्रस्तावना दिली होती. त्या वेळी त्यांच्या-माझ्या बऱ्याच भेटी झाल्या होत्या, बरंच बोलणं झालं होतं. माझ्यासाठी हा खूपच मोठा अनुभव होता. कारण, एका अशा मान्यवर कवीकडून आपल्याला कवितेच्या पुढच्या प्रवासाची दिशा मिळणं, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. ते नेहमी खरेपणाने वागायचे. म्हणजे तोंडावर कौतुक केलं, असं त्यांचं नव्हतं. तुमचं चुकलं असेल तर ते अगदी कान पकडून सांगायचे. ही गोष्ट फार महत्त्वाची असते. त्या वयात अशा व्यक्तीचा सहवास मिळणं आणि आपण त्यातून काहीतरी शिकणं, ही माझ्यासाठी खूप मोठी प्रोसेस होती. त्यांचा जो सहवास त्या काळात मिळाला, तो फार मोलाचा आहे माझ्यासाठी. 

पाडगावकर प्रतिभावंत कवी होते. वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी कविता लिहिल्या होत्या. प्रेमकविता, तत्त्वज्ञान सांगणाऱ्या कविता, बालगीतं, निसर्गकविता... कवितेचा एकही ऍस्पेक्‍ट शिल्लक नाही, ज्याला त्यांनी स्पर्श केला नाही. पॉलिटिकल सटायर, हास्यकविता, व्यंगकविता असेल आणि सगळ्यावर कडी म्हणजे "श्रावणात घन निळा बरसला‘ हे त्यांचं अप्रतिम गाणं! आजतागायत पावसाची गाणी म्हटलं की, हे गाणं डोळ्यांसमोर येतं... कानांत घुमत राहतं... आणि अलगद मनातही उतरतं. खरंच, ते वेगळ्याच प्रतिभेचे कवी होते. 

कविता करणं हा प्रतिभेचा भाग आहे. खरंय; पण या कवितेला लोकाभिमुख करणंही महत्त्वाचं असतं. लोकांच्या घराघरांत नेऊन पाडगावकरांनी कविता रुजवली. वसंत बापट आणि विंदा करंदीकर यांच्यासोबत त्यांनी अक्षरश: जगभर फिरून कवितांचे कार्यक्रम तर केलेच; पण नंतर जग बदललं, तंत्रज्ञान बदललं, तशा त्यांच्या कवितावाचनाच्या अनेक सीडीज निघाल्या आणि त्या घरोघरी वाजू लागल्या. लोकांच्या तोंडी रुळल्या आणि आपसूकच "कविता म्हणजे काहीतरी कठीण...‘ असा कवितांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला. कवितेशी लोक जोडले गेले. पुस्तकाच्या बाहेर जाऊन त्यांनी केलेलं हे काम कवितांसाठी खूप मोठं आहे. मराठी कविता त्यांची त्यासाठी नेहमी ऋणी राहील. 

आपण कालातीत आहोत, असा पाडगावकरांचा दृष्टिकोन नव्हता. त्यांचं आयुष्य ते सुंदर पद्धतीने आणि भरभरून जगले आहेत. त्यांची आठवण मला नेहमीच येईल; पण मला नाही वाटत की त्यांना त्यांच्यामागे कोणी अश्रू गाळलेले आवडलं असतं. आयुष्यभर त्यांनी जो हसरेपणा जोपासला, त्याची आठवण काढत राहणं आणि कवितेशी प्रामाणिक राहणं, ही त्यांना सर्वांत सुंदर श्रद्धांजली असेल. 

- स्पृहा जोशी

Friday, December 11, 2015

थोडीशी मज्जा !!

तुम्हा सर्वांकरिता थोडीशी मज्जा !!
Here is a chance to win free passes and meet Umesh Kamat & me at the premiere show of our brand new play
तुम्हाला एवढंच करायचंय...
" वरी बी परफेक्ट हँप्पी मॅच डोण्ट मिस " मध्ये दडलेल्या दोन नाटकांची अचूक नावं ओळखून १२ डिसें मध्यरात्री १२ पर्यंत 8828101085 ह्या नंबरवर तुमच्या नावासोबत SMS करायचंय.
बघूया किती फ्री पासेस जिंकताय तुम्ही..hurry up!!



Tuesday, December 8, 2015

पहिल्या पावसात भिजतानाचा धुंद करणारा अनुभव

पाऊस कधी रिमझिम, कधी मुसळधार तर कधी अचानक धुंद करणार, कधी कवेत घेणारा ओला हळवा पाऊस.
पावसाच्या अशाच काही गोड आठवणींबद्दल सांगतेय 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' आणि 'उंच माझा झोका' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री स्पृहा जोशी...
''पावसाचे थोडक्यात वर्णन करायचे म्हणजे पाऊस माझ्यासाठी ऊर्जा आणि आयुष्य. पावसाळा हा माझा आवडता ऋतू आहे. जून महिना आला, की अगदी चातकाप्रमाणे मी पावसाची वाट बघत असते. मी मुळची मुंबईची. मुंबईत चिपचिप करणारा उन्हाळा आणि फसवणारी थंडी असते. त्यामुळे मला पाऊस खूप आवडतो. बालपणापासून दरवर्षी पहिल्या पावसात भिजणं मी कधीही चुकवलेलं नाही. पहिल्या पावसात चिंब भिजतानाचा अनुभव धुंद करुन जातो. पाऊस मला प्रणयरम्य वाटतो. पाऊस गाणी, कवीतांची मी अक्षरशः वेडी आहे. त्यात मी अगदी हरवून जाते. अनेक लोकांना पाऊस म्हणजे चिखल, कटकट वाटतो, पण मला पावसाबद्दल कधीच तसं वाटलं नाही. जणू मला पाऊसवेडच आहे . 

मी पाऊस कुठेही एन्जॉय करु शकते. अगदी गच्चीत पडणारा पाऊसही मी तितकाच एन्जॉय करते. शिवाय जिथे समोर पाणी दिसतं... उदाहरणार्थ नरिमन पाँईंट, सीफेसवरसुद्धा मला पाऊस एन्जॉय करायला आवडतो.

काही दिवसांपूर्वी मी माझ्या कुटुंबीयांबरोबर सिंहगडावर गेले होते. तिथे अचानक पाऊस पडायला लागला. वर उंचावर अंगावर पडणाऱया पावसाची मजा मी लुटली. त्यामुळे पावसाची मजा लुटण्यासाठी एखादी ठराविक जागा मी निवडत नाही. बाहेर पडणारा पावसाचा अगदी खिडकीत बसूनही मी सुखद अनुभव घेत असते.

पाऊस म्हटला, की डोळ्यासमोर येतात ती गरमागरम भजी आणि कणीस. लिंबू मारके कणीस खाण्याची मजा पावसाळ्याशिवाय इतर ऋतूत येऊच शकत नाही, असं मला वाटतं. सोबत जर गरमागरम चना मसाला असेल तर मग विचारायलाच नको.

मी म्हटल्याप्रमाणे मला पाऊस गाणी ऐकायला खूप आवडतात. नॉस्टेल्जिक अनुभव देणारी आशा ताईंच्या स्वरातील, गुलजार आणि आर.डी बर्मन कॉम्बिनेशन असलेली गाणी माझी आवडती आहेत.

मी माझ्या कुटुंबीयांबरोबर पावसाची मजा लुटत असते. मात्र गेल्या पाच वर्षांपासून ही मजा लुटण्यात एक वेगळीच गंमत येतेय. त्याचे कारण म्हणजे माझा होणारा नवरा. तो माझ्या आयुष्यात आल्यापासून म्हणजे गेल्या पाच वर्षांपासून मी त्याच्याबरोबर हा रोमँटिक ऋतू अनुभवतेय. वरद लघाटे हे त्याचे नाव. याचवर्षी आमचा साखरपुडा झाला. कामाच्या व्यापामुळे पावसात लाँग ड्राईव्हला जाण्याची वारंवार संधी मिळत नाही. मात्र जो वेळ मिळतो तो एकत्र घालवतो.

पावसात माझी फारशी फजिती झालेली नाही. हं पण... अलीकडेच पावसात शूट करता-करता मी घसरुन पडले. जिथे शूट सुरु होतं तिथे चिखल झाला होता. मी पाऊस एन्जॉय करतेय, अशाच आशयाचं ते शूट होतं. पण तोल ढासळल्यामुळे मी चिखलात पडले. त्यानंतर मात्र जपून जपून ते शूट पूर्ण केलं. खरं सांगू ते चिखलात पडणंही मी एन्जॉय केलं.

पावसाळ्यात छत्री आणि सनस्क्रिन लोशन या दोन गोष्टी माझ्यासोबत असतात. शिवाय पटकन सुकणारे कपडे परिधान करण्यावर माझा भर असतो. त्यामुळे बिनधास्त भिजता येतं. खबरदारी म्हणून खूप पाऊस पडत असल्यास मी बाहेर जाणं टाळते.

पावसात स्वतःच्या तब्येतीची काळजी म्हणून बाहेरचे अनहायजेनिक फूड खाणं टाळलं पाहिजे. खूप पाणी पिण्यावर भर असायला हवा. बाहेरचं पाणी शक्यतो पिऊ नये आणि सनस्क्रिन लोशन लावल्याशिवाय बाहेर पडू नये, असंच मी तुम्हाला सांगेन. कारण या सर्व गोष्टी मी स्वतः फॉलो करते. या सर्व गोष्टींची काळजी घेतल्यास आपण हा हळवा आणि मनाला वेड लावणारा पाऊस अडथळ्याविना अनुभवू शकतो.'' 

स्पृहा जोशी

Monday, December 7, 2015

एक 'रावण' हवाय...


बरेच राम झेललेत आपण. ‘देव’ व्हायच्या खोट्या गंडापायी माणूसपण हरवलेले... आता एक ‘रावण’ हवाय. खचल्या पिचल्या आजच्या ‘असुरां’चं साम्राज्य उभं करण्यासाठी, नवा श्वास देण्यासाठी एक खराखुरा ‘माणूस’ हवाय...
गेले काही दिवस ‘असुरा’ नावाचं खूप सुंदर पुस्तक वाचते आहे. आनंद नीलकांतन यांनी लिहिलेलं. इतिहास हा नेहमीच जेत्याच्याच नजरेतून लिहिला जातो, हे त्रिकालाबाधित सत्य तर आपल्याला माहीत आहेच. या पुस्तकातून ते ठसठशीतपणे समोर येतंच; पण जरा वेगळ्या पद्धतीने. कारण हा आहे एका पिचलेल्या जमातीचा इतिहास. त्यांच्या अत्यंत कीर्तिमान आणि खर्‍याखुर्‍या ‘माणूस’ असलेल्या ‘रावण’ नावाच्या सम्राटाचा इतिहास. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व युगांत, सर्व काळात पिचत पिचत आपलं अस्तित्व टिकून राहावं म्हणून जगण्याची लढाई लढू पाहणार्‍या सामान्यातील सामान्य माणसाचा इतिहास.
हे पुस्तक वाचताना सतत माझ्या आसपासच्या जगाशी त्या घटनांचा संबंध जोडू पाहतेय; आणि गंमत म्हणजे, त्या सगळ्या व्यक्तिरेखा माझ्यापुढे आत्ताची माणसं होऊन उभ्या राहताहेत. पण लखलखीतपणे एक गोष्ट जाणवतेय ती म्हणजे, पिढ्यान्पिढ्या लादली गेलेली, आणि कदाचित त्यामुळे सवयीची होऊन बसलेली एक भयाण मानसिकता. दगडी संकल्पना, टोकाची असहिष्णुता, स्त्रियांबद्दलची ठरीव मतं, वर्णव्यवस्था, स्वार्थाने लदबदलेल्या जातीपातीच्या उतरंडी, सत्यात जगायला घाबरायला होतं म्हणून जोंबाळलेला पलायनवादी दृष्टिकोन...
‘Dignity of Labour’ ही संकल्पना किती सहज हद्दपार केलीये आपण आपल्या सामाजिक आयुष्यातून. प्रत्येक कामाचा आपल्या पद्धतीने ठरवलेला एक दर्जा आणि ते काम करणार्‍या व्यक्तीचं पोलादी सामाजिक चौकटीतलं एक पक्कं स्थान. का? कदाचित फार स्वस्त मिळतंय आपल्याला हे सगळं म्हणून? पैसे फेकून हवं ते मिळवता येतं हा माज आहे, म्हणून? का मग ही असली कामं असल्याच लोकांनी करायची असतात, ही तीच युगानुयुगांची पक्की समजूत, म्हणून? या सगळ्यांना स्वत:चं स्थान निर्माण करायला शिडी मिळूच नाही द्यायची? एखाद्याने ते सिद्ध केलंच, तर त्याची हेटाळणी करत राहायची? आणि त्यात जर ती स्त्री असेल, तर मग प्रश्नच मिटला.
मला हे सगळं प्रकर्षाने जाणवतंय, ते गेल्या काही दिवसांतल्या चर्चा ऐकून. उबग आल्यासारखं वाटतंय. निवडणुका झाल्या. प्रचार झाले. पूर्वीच्या सत्ताधारी आणि आता विरोधी (आणि उलटसुद्धा) पक्षांनी एकमेकांवर वैयक्तिक नारेबाजी, कुरघोड्या, प्रसंगी चिखलफेक असं एकही शस्त्र वापरायचं सोडलं नाही. fair enough.. लोकशाहीच्या खेळाची अशीही एक पद्धत! पण काही मुद्द्यांची मला वैयक्तिक शिसारी वाटली. आता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री असलेल्या स्मृती इराणी, या कोणे एके काळी MacDonald's मध्ये बर्गर सर्व्ह करायच्या. ‘ही अशी बाई कॅबिनेटमध्ये इतक्या महत्त्वाच्या जागेवर असूच कशी शकते?’ अशी हाकाटी विरोधकांकडून मारण्यात आली. म्हणजे? हा कुठला मुद्दा? एक सामान्य मुलगी आपल्या स्वत:च्या हिमतीवर जगण्याचं भान उंचावते, जीवतोड कष्ट करून, तिच्या पिढीची सर्वाधिक लोकप्रिय टीव्ही नायिका बनते, निवडणुकीत राहुल गांधींविरोधात जिंकण्याचा अपार प्रयत्न करते, ही गोष्ट जास्त वंडरफुल नाही? याने आपला ऊर भरून येत नाही? कोणे एके काळी सोनिया गांधी जेव्हा राजकारणात प्रवेश करत होत्या, तेव्हा ‘एक वेट्रेस काय देश चालवणार’ अशी हेटाळणी त्यांच्या विरोधकांनीही केली होतीच की! खुद्द पंतप्रधान मोदींनासुद्धा ‘मी लहानपणी ‘चहावाला’ होतो. आणि गरीब मागास जातीचा मुलगा आज पंतप्रधान व्हायचं स्वप्न पाहू शकतो,’ हे ‘सांगावं’ लागलं.
कोणी कोणावर सत्ता गाजवायची, ते जन्मसिद्ध हक्कानेच सिद्ध होतं; ते कष्टसाध्य असूच शकत नाही, या सरंजामशाही, बुरसट मनोवृत्तीतून कधी बाहेर पडणार आपण? हा कोतेपणा, भित्रेपणा दिवसेंदिवस इतका सवयीचा होत जातोय की, षंढत्व भिनत जातं अंगात. मग एखादी बाई कळवळून म्हणते, बदमाशांची नाही, बघत राहणार्‍या षंढांची भीती वाटते.. पण तेवढ्यापुरते दचकून आपण पुन्हा निघून जातो आपल्या सुखी कोषांत...कारण बाईच्या मताला किंमत द्यायची सवयच नाहीये आपल्याला, आपल्या समाजाला. पिढ्यान्पिढ्या, युगानुयुगे!! म्हणूनच आनंद नीलकांतन यांचं ‘रावणायन’ (असुरा) मला खूप आपलंसं वाटतंय. बरेच राम झेललेत आपण. ‘देव’ व्हायच्या खोट्या गंडापायी माणूसपण हरवलेले... आता एक ‘रावण’ हवाय. खचल्या पिचल्या आजच्या ‘असुरां’चं साम्राज्य उभं करण्यासाठी, नवा श्वास देण्यासाठी एक खराखुरा ‘माणूस’ हवाय...

स्पृहा जोशी

Sunday, December 6, 2015

डोंगराएवढ्या माणसांची शिदोरी !

गेले काही दिवस फार विचित्र अनुभव येतायत मला.. प्रसंग पहिला : करिअरची नवी नवी सुरुवात. कोणीच ओळखी-पाळखीचे लोक आसपास नाहीत. टक्के टोणपे खात स्वत:ला सिद्ध करायची धडपड चाललेली... नव्या क्षेत्रात उतरण्याची भीती, आणि स्ट्रगलचा चकवा.. आसपास काही मातब्बर लोक. असे अनुभवी मातब्बर लोक.. नवीन माणसाला या चकव्यातून बाहेर पडायला मदत न करणारे. एका सुप्रसिद्ध दिग्दर्शकाने मला सांगितलं होतं, ‘तू ना हिरोईनसारखं वागत नाहीस. तिच्याकडे एक attitudeपाहिजे.. तू टिकणार नाहीस फार. सेटवरच्या सगळ्या माणसांशी हे असं नसतं वागायचं हीरोइनने...’ मी दडपून गेले. ‘हे असं म्हणजे??’ माज करत फिरली, सतत नखरे केले, म्हणजे हीरोइन चांगली? बाकी मी काम कसं करते, किती प्रामाणिक आहे, भूमिका समजून घेते का नाही, याला काही महत्त्व नाही?? मी जपून जपून त्याला हे विचारत राहिले. त्यावर तो म्हणाला, ‘अगं किंमत नाही ठेवत मग कोणी...’ कमाल आहे बुवा! ‘यूही हम दिल को साफ रखा करते थे, पता नही था की किमत चेहरे की होती है!’ (हे तेव्हा नव्हतं सुचलं वाक्य, आता मागाहून आलेलं शहाणपण आहे) गंमत राहू दे, पण इंडस्ट्रीने मला दिलेला हा पहिला कानमंत्र होता.
माझ्या पक्का लक्षात राहिलेला, पण मी कधीही न पाळलेला...
प्रसंग दुसरा- एका कुठल्या तरी वेबसाइटने माझं नाव वापरून भलतीच गोष्ट अपलोड केली होती. एका मित्राच्या ते लक्षात आल्यावर नाना खटपटी करून त्याने ते प्रकरण नीट सांभाळलं. पण मनस्ताप व्हायचा तो झालाच. त्यावर तो म्हणे, ‘तू याच्याकडे उत्तम साईन म्हणून बघ गं, दुसर्‍या देशातल्या कोणा वेबसाइटला तुझं नाव वापरलं की त्यांच्या हिट्स वाढतील असं वाटत असेल, तर तुझी popularityबघ न कितीये...’ त्याच्या माझ्यावरच्या प्रेमाचा भाग सोडून देऊ, पण मी मात्र हलले या गोष्टीमुळे. एकीकडे वाटत होतं, आपल्याला बरं का वाटत नाहीये या प्रतिक्रियेमुळे? आपली ओळख नेमकी काय?

प्रसंग तिसरा - माझ्या कामाचं माझ्या तोंडावर प्रचंड कौतुक करणारे एक दिग्दर्शक खासगीत एका पार्टीत म्हणाले, ‘ही हीरोइन मटेरियल नाय रे. फिल्म्समध्ये नाही चालणार ही मुलगी. तिच्यात ‘ते’ नाही!’ आधी खूप वाईट वाटलं मला; पण हळूहळू शांतपणे थांबून पाहायला लागले. ही किमया आमच्या ‘तिसरी गोष्ट’च्या पटकथाकार संदेश कुलकर्णीची. संदेशदादाने आमच्या मालिकेत एकदा एक फार सुंदर संवाद लिहिला होता... मोठे बाबा ईशाला सांगतात, ‘मला जेव्हा एखादी गोष्ट कळत नाही न, तेव्हा उत्तर शोधायची मी घाई नाही करत; मी वेळ घेतो, त्या गोष्टीपाशी थांबतो, आणि मग ती गोष्ट आपोआप उमलत जाते...’ मीही थांबले, हळूहळू शांतपणे पाहायला लागले, तशी नव्याच गोष्टी उलगडत गेल्या समोर.

पहिला प्रश्न मी स्वत:ला विचारला की, ‘चांगली अभिनेत्री’, की ‘लोकप्रिय नटी’ नेमकं काय बनावंसं वाटतंय आपल्याला? प्रसिद्धी, पैसा, यश हे सगळं तर हवंच आहे. मग हा dilema का येतो? माझी आई नेहमी म्हणायची, अजूनही सांगते; लोकप्रियता हाताळणं हे फार कष्टाचं काम आहे. येरागबाळ्याला नाही जमत ते... पावलापावलावर तिचं हे सांगणं किती यथार्थ आहे हे जाणवत राहतं.

असे खूप मित्रमैत्रिणी पाहिलेत मी आमच्या क्षेत्रात, हे लोकप्रियतेचं भूत न पेलवणारे. वेगळंच वागणारे.. आपल्याला तसं व्हायचं नाही. पडद्यामागे अभिनय करता करता ‘कट’ म्हटल्यानंतरही अभिनय करत राहणारे. अशा खोट्या मांदियाळीत आपल्याला जायचं नाही. नाही व्हायचं आपल्याला मोठ्ठी हीरोइन. बरं माणूस होता आलं तरी पुरे. हळूहळू जसं काम करत गेले, तसं एक एक डोंगराएवढी माणसं भेटत गेली. पडद्यामागची कामं करणारे कामगार, तंत्रज्ञ यांच्यासाठी जीव टाकणारी कित्येक मंडळी. त्यांचं भलं व्हावं म्हणून तीळतीळ तुटणारी... कोणी सगळ्यांचा विमा काढून द्यायचं काम अंगावर घेतलेलं, तर कोणी त्यांना सुग्रास जेवण मिळावं म्हणून धडपडणारं. कोणी त्यांच्या कामाचे तास कसे आटोक्यात राहतील यासाठी आकाशपाताळ एक करणारं, तर कोणी नुकत्या हातात आलेल्या तुटपुंज्या नाइटचं अख्खं पाकीट लाइटमनच्या हातात सुपूर्द करणारं...

या माणसांना भेटल्यावर आसपासच्या लोकांकडे बघण्याची पद्धतच बदलली. माणसाकडे माणूस म्हणूनच बघायला पाहिजे, हे कळलं. मनापासून हसल्यामुळे काय कमी होतं आपलं? एखाद्याशी प्रेमाने बोललो, तर कितीशी पत कमी होते? हे एकदा लक्षात आल्यानंतर मग हे आपली इंडस्ट्रीत किंमत किती,’ असले फिजूल प्रश्न पडेनासेच झाले... खूप नवे नवे मित्र मिळाले. स्पॉटबॉईज, हेअरड्रेसर्स, मेकअपमेन, लाइट दादा किती तरी मित्रमैत्रिणी. आपली माणसं झाली, एका हाकेला धावून येतील अशी. नवी कामं मिळतील, तितका विश्वास आहे माझा माझ्यावर. पण ही माणसांची जंगी फौज या कशाहीपेक्षा फार म्हणजे फारच मोलाची आहे. विचित्र अनुभवांची ही किंमत मोजून जे संचित मिळालंय, ते मात्र खरोखरच अनमोल असंच आहे. प्रवास चालूच आहे. वाट धुंडाळणं चालूच आहे. तहानलाडू भूकलाडू म्हणून ही अशी शिदोरी आहे सोबत.. मनात एकच धरून चाललेय,
कुण्या गावातली ती वाट होती पोरकी,
तिला ठाऊक नव्हती चाल दुसरी बेरकी;
दिगंताचे तिला अदमास नव्हते नेमके,
हसायचे कशासाठी तिने मग नाटकी..!!

- स्पृहा जोशी

Saturday, December 5, 2015

एक अनामिक ओझं

मुक्तछंद - प्रत्येक प्रवासाची सुरुवात पाठीवर एक ओझ्याचं गाठोडं घेऊन होते. एक नवा शोध, नवी माणसं, नवी नाती. गुंत्यात न गुंतता निर्लेप राहून शेवट गोड करण्याची अटळ धडपड. पण हे न गुंतणं साधत मात्र नाही. 

प्रत्येक गोष्टीला एक शेवट असतोच. आपल्याला आवडो किंवा न आवडो. सुरू होताच तिचा अंतही ठरलेला असतो. पण हे लक्षात घ्यायला इतका वेळ का लागतो मला?

प्रत्येक प्रवासाची सुरुवात पाठीवर एक ओझ्याचं गाठोडं घेऊन होते. एक नवा शोध, नवी माणसं, नवी नाती. गुंत्यात न गुंतता निर्लेप राहून शेवट गोड करण्याची अटळ धडपड. पण हे न गुंतणं साधत मात्र नाही. प्रत्येक वेळी तीच ओढाताण, आणि शेवट जवळ यायला लागल्यावर पाठीवर जास्तीत जास्त जाणवायला लागणारं कसलं तरी अनामिक ओझं.

मीच अवघड करून घेते, माझ्या प्रवासाचा रस्ता. खाचखळगे, काट्याकुट्यांचा रस्ता ओढवून घेते, स्वत:वर बहुतेक. कारण माझ्या बरोबरच्या सहप्रवाशांना इतका त्रास होतोय, असं जाणवत का नाही मग! त्यांच्यासाठी का सोपं असतं, हे ‘न गुंतणं’?? कसं जमतं त्यांना असं कमळावरचा थेंब होण्याइतकं मोकळं राहणं? मला शिकायचंय हे असं, पाण्यात राहूनही न भिजत पोहणं. मलाही हवाय हा सहजपणा. खूप अंतरावर असल्यासारखं वाटतं, लोकांच्या अगदी जवळ असूनसुद्धा. पुसून टाकायचंय ते अवघडलेपण. एक संशोधक म्हणायचा म्हणे, ‘आपल्या प्रत्येकात एक आदिम माकड दडलेलं असतं.’ माझ्या आतलं माकड हल्ली मला जास्त जास्त जाणवायला लागलंय. माझ्या अशा दुहेरी वागण्याला कंटाळून थकून गेलं असावं बहुतेक. त्याचं आतल्या आत वाढत चाललेलं वजन जाणवतं मला अलीकडे रोज. ते मला झेपत नाहीये, हे जाणवत असावं बहुधा, त्यालाही! माझा शून्य वेग त्याच्या उतावीळ धडपडीला पाहवत नाही. आसपासच्या कशानेच माझं रक्त उसळत नाही, म्हणून ते उसळत असतं आतल्या आत. इतक्या जोरात की, हृदयाची धडधड वाढते आणि आतलं माकड या क्षणी बाहेर पडेल की काय, अशीही भीती वाटायला लागते मला, बर्‍याचदा... मी त्याला थोपवून धरते, माझ्या पूर्ण शक्तीनिशी. मग ते आणखी चिडतं, चेकाळतं. आतल्या आत गुरगुरायला लागतं. ते गुरगुरणं वाढतं, वाढतंच जातं, माझ्या खांद्यावरचं प्रवासाचं ओझं वाढतं, वाढतंच जातं... प्रवासात गवसलेला आनंद मागे पडत जातो प्रत्येक पावलागणिक, आणि हे दु:ख सामोरं येत राहतं उरलेल्या वाटेला लगडून.

पण अशीही एक वेळ येईल कदाचित, सगळं इतकं ‘खरं’ होईल, ही वरवरची ‘मी’ पार भेदून आतलं माकड वर येईल. अस्तित्वाचे हे असले भुक्कड प्रश्न त्याला पडणार नाहीत. नुसत्याच फिजूल विचारांनी त्याच्या कपाळावर आठ्यांची जाळी पडणार नाहीत. ते जगत राहील निरुपयोगी विचार न करता, त्याला हवं तसं. मोकळा श्वास घेईल त्याला हवा तेव्हा. डोळ्यातल्या काजव्यांची चमक हरवू देणार नाही, हृदयातल्या निखार्‍यांची धग विझू देणार नाही. नुसतंच ‘जगाला’ लायक न होता ते ‘जगायला’ लायक होईल... कदाचित...

...आज या गोष्टीच्या शेवटाकडे पुन्हा एकदा मी एकटी उभी आहे. माझ्या माझ्या विचारांच्या वाळवंटात... माझे सगळे सहप्रवासी प्रवासाच्या सुखद आठवणी सांगतायत, एकमेकांना आनंदाने. आणि मी हातात घट्ट धरून ठेवू पाहते आहे, त्याच प्रवासाची निसटणारी वाळू. मृगजळ शोधत माझा हा समांतर प्रवास असाच चालू राहणार बहुधा, कायमचा... कारण प्रत्येक गोष्टीला एक शेवट असतो, असायला हवा, हे मान्यच करत नाही माझ्यातलं वेडं माकड...!!!

- स्पृहा जोशी

लोपामुद्रा घडताना...


‘लोपामुद्रा’चा अर्थ समजावताना मला अरुणाताई मागे म्हणाल्या होत्या, ‘‘समोरच्याच्या अस्तित्वात जिची मुद्रा लोप पावली आहे, अशी स्त्री. या संकल्पनेने त्या दिवशी खर्‍या अर्थाने माझ्या मनात आकार घेतला. आणि मग अशा कित्येक ‘लोपामुद्रा’ घरी-दारी, शेजारी-पाजारी नव्याने दिसायला लागल्या.

पाच वर्षांपूर्वीची गोष्ट. स्थळ : कविवर्य मंगेश पाडगावकरांचा दिवाणखाना. प्रचंड दडपणाखाली धडधडत्या हृदयाने हातात ‘चांदणचुरा’ची रफ कॉपी घेऊन बसलेली मी... माझं टेन्शन थोडं थोडं आईच्याही चेहर्‍यावर उतरू लागलेलं. माझ्या हातात भाऊ मराठ्यांनी दिलेली चिठ्ठी- ‘‘या मुलीच्या काव्यसंग्रहाला आपण शुभाशीर्वादपर काही लिहून द्यावे, ही विनंती.’’ त्या चिठ्ठीला घामेजलेल्या हातात सतरा वेळा खेळवून चुरगळून पुन्हा उघडून पाहून झालेलं. इतक्यात दस्तुरखुद्द मंगेश पाडगावकर हळूहळू पावलं टाकत आले, चक्क समोर बसून म्हणाले, ‘‘बोला... मी काय करू तुमच्यासाठी???’’ मी blank... संपूर्ण पाटी कोरी. देवळात गेल्यावर अचानक मूर्तीच तुमच्याशी बोलायला लागली तर??? जवळपास तशीच अवस्था. ततपप!!! माझ्याकडून जुजबी माहिती कळल्यावर पाडगावकरांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. ‘‘कविता करते म्हणत्येस, पण वाचतेस का? आवडता कवी कोण? त्याची एखादी कविता म्हणून दाखव. छंद, वृत्तांचा अभ्यास केलायस?’’ बाऽऽऽऽप रे!! मला काही सुधरेच ना. मला म्हणाले, ‘‘मी वाचतो तुझं हे बाड, पण कविता आवडल्या नाहीत तर मी खोटं लिहिणार नाही हां...’’ जाड चष्म्याच्या आतून त्यांचे प्रेमळ मिश्कील डोळे मला लुकलुकताना दिसले. अचानक हुश्श वाटलं.

आठ दिवसांनी जेव्हा पुन्हा त्यांच्याकडे गेले, तेव्हा मनोगत लिहून तयार होतं. ‘‘छान लिहितेस तू; पण वाच, आणखी खूप वाच. शब्दांशी खेळायला शिक. त्यांच्याशी झटापट करू नकोस, ते आपणहून येऊ देत तुझ्यापाशी. लिहीत जा रोज नेमाने. सवय लावून घे लिहिण्याची. कुसुमाग्रज वाच, बोरकर वाच, इंदिराबाई वाच, खूप वाच. आणि बघ, जमल्यास हा पाडगावकर पण वाच...’’ पुन्हा एकदा हसर्‍या मिश्कील डोळ्यांची लुकलुक... या वेळेस मात्र मला भीती नाही वाटली. मीसुद्धा खदखदून हसले. जवळपास नाचत नाचत घरी आले होते, ते ‘शुभाशीर्वाद’ घेऊन. त्यांचा प्रत्येक शब्द, प्रत्येक भाव मी खरंच कानात प्राण आणून ऐकला होता. ‘चांदणचुरा’चा भाग्ययोग म्हणायचा की, यांच्या शब्दांचं त्या पुस्तकाला कोंदण मिळालं. कवी प्रवीण दवणे यांनी प्रस्तावना लिहिली, ‘धुक्यातून कोवळे किरण यावेत तशी कविता...’ किती सुंदर वाट दाखवली दवणे सरांनी पुढच्या प्रवासासाठी. किती सहज. किती सोपी... आमचे निसर्गकवी नलेशदादा पाटील स्वत: प्रकाशनाला प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. आणि कवितेची उत्तम जाण असलेले ज्येष्ठ नाटककार, माजी नाट्यसंमेलनाध्यक्ष सुरेश खरे... माझे खरे आजोबा... जातीने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित राहिले, माझ्या कवितांचं रसग्रहण करायला... ‘अक्षरग्रंथ’च्या डॉ. रामदास गुजराथी सरांनी किती कौतुकाने केलं हे पुस्तक. सगळ्यात कहर म्हणजे माझे अत्यंत आवडते, ज्येष्ठ कवी शंकर वैद्य यांनी कौतुकाचं पत्र पाठवलं होतं, ‘चांदणचुरा’ वाचून. हर्षवायू... वेळ खरंच किती भराभर निघून जातो... पाच वर्षं झालीसुद्धा...

आत्ता हातात ‘लोपामुद्रा’ची प्रुफं घेऊन बसले आहे. आणि या सगळ्या आठवणींनी कोंडाळं केलंय. झरझर किती गोष्टी गेल्या नजरेसमोरून. आता माझा दुसरा काव्यसंग्रह तयार होताना बघतेय. खूप म्हणजे, खूप मजा वाटतीये मला. पुन्हा तीच हुरहुर, पुन्हा तीच उत्सुकता, पुन्हा तशीच धडधड. कुठून सुरू झालं बरं? ‘चांदणचुरा’नंतर कविता करत होतेच जेव्हा जमतील तशा. ‘उंच माझा झोका’च्या सेटवर अचानक एक दिवस आमच्या प्रा. नितीन आरेकरांसोबत ‘तारांगण प्रकाशना’चे मंदार जोशी आले होते. गप्पा मारता मारता अचानक ते म्हणाले, ‘‘आपण करूया की तुझं पुस्तक...’’ मी चकित. माझ्या ढिम्म स्वभावाप्रमाणे मी आधी निवांतच घेतलं ते बोलणं; पण मंदार सरांनी मात्र त्यांचा शब्द खरा करून दाखवला. अगदी माझ्या सगळ्या कविता गोळा करून, त्यांना हा आजचा आकार येईपर्यंत. कित्येक वर्षांपूर्वी सुमित पाटील नावाचा माझा गुणी चित्रकार मित्र मला म्हणाला होता की, तुझ्या पुस्तकाचं डिझायनिंग मी करणार. आज ‘लोपामुद्रा’ त्याच्या अर्थवाही चित्रांनी सजून नटून माझ्या हातात आहे.

आज या सगळ्याकडे जरा बाजूला होऊन पाहताना मला जाणवतंय की, आपलं एक पुस्तक येतंय, हा आनंद तर आहेच; पण या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, हा प्रवास करत असताना जे संचित गाठीशी आलंय, ते केवळ अवर्णनीय असं आहे.

माझी एक हक्काची मोठ्ठी मैत्रीण आहे. तिला मी कधीही उठून माझ्या मनातली शंका विचारू शकते, तिचं नाव कवयित्री अरुणा ढेरे. ‘लोपामुद्रा’चा अर्थ समजावताना मला अरुणाताई मागे म्हणाल्या होत्या, ‘‘समोरच्याच्या अस्तित्वात जिची मुद्रा लोप पावली आहे, अशी स्त्री. प्रत्येक भारतीय स्त्री ही त्या अर्थाने खरं तर लोपामुद्राच आहे. with choice or without choice...’ या संकल्पनेने त्या दिवशी खर्‍या अर्थाने माझ्या मनात आकार घेतला. आणि मग अशा कित्येक ‘लोपामुद्रा’ घरी-दारी, शेजारी-पाजारी नव्याने दिसायला लागल्या. त्यांचं भावविश्व खुणावायला लागलं. साखरजाग, जाग, माध्यान्ह आणि निरामय असे त्यांच्या आयुष्यातले वेगवेगळे टप्पे ‘माझे’ होऊन आपलेसे वाटायला लागले. ‘लोपामुद्रा’ घडू लागली होती... आणि आज तिचं देखणं, साजरं मूर्त रूप माझ्या हातात आलंय. माझ्या आत काही तरी लकाकतंय. मला खरंच भरून येतंय. या प्रवासाने माझ्या आतल्या लोपामुद्रेला सुखावलंय. नवं पाऊल टाकायला मला नवं बळ दिलंय...

- स्पृहा जोशी