Saturday, October 24, 2015

जगण्‍याला'ला पडलेले प्रश्‍न

स्वत:च्या मनाचं ऐकून तसंच प्रत्यक्ष वागण्याची हिंमत फार कमी जणांकडे असते. या दोघीही त्याचं मूर्तिमंत प्रतीक. अभिनयाच्या बाबतीत तर काय बोलावं. नैसर्गिक अभिनयाच्या चालत्याबोलत्या पाठशाळाच जणू. चश्मेबद्दूर, कथा, अनकही, मेमरीज इन मार्च मधली दीप्ती आणि अर्थ, भूमिका, मंडी, मंथन यांतली स्मिता कशी आणि कोण विसरू शकेल? अर्थात त्यांची अभिनयशैली, चित्रपट क्षेत्रातलं त्यांचं योगदान या सगळ्याबद्दल मी चर्चा करत नाहीचे आत्ता. कारण मी त्यांच्याबद्दल काहीही बोलणं म्हणजे बेसिक काजव्यानं तळपत्या सूर्याकडे झेपत नसताना डोळे फाडफाड उघडे ठेवून बघत राहण्याचा अट्टहास करण्यासारखंच आहे. पण या दोघींचा माझ्यावर प्रचंड प्रभाव आहे, हेही तितकंच खरं. आज हे सांगण्याचं कारण म्हणजे, काही दिवसांपूर्वी एक ‘न पाठवलेलं पत्र’ माझ्या वाचनात आलं. मुळात ‘पत्र’ या विषयाबद्दल मला खूप ओढ आहे. त्यामुळे खेचली गेले मी त्याच्याकडे. पत्र नव्हतं ते साधंसुधं. कविताच होती मुक्त. ओठंगून आलेल्या भावना होत्या. पूर्वी कधी काळी सांगायचं राहून गेलेलं, व्यक्त-अव्यक्तसं बरंच काही होतं त्या काही ओळींमधून ओसंडणारं. मनात घर करून गेला त्यातला पारदर्शी नितळपणा. ते पत्र होतं दीप्तीने आपल्या मैत्रिणीला, स्मिताला लिहिलेलं.. ती गेल्यावर... त्या हृदयस्पर्शी कवितेचा भावानुवाद आपल्याशी शेअर करते आहे. कारण बघायला गेलं तर हे आपल्या प्रत्येकाचं म्हणणं आहे. त्यांच्या चंदेरी दुनियेतून, त्या झगमगाटातून ही कविता आपल्या जगण्याशी जोडून पाहा, तुम्हाला जाणवेल की हे आपलेही प्रश्न आहेत.

सतत धावताना 
आपापल्या स्वप्नांपाठी 
आपण भेटायचो प्रत्येक वेळी- 
बॅगेज क्लेम्स 
व्ही. आय. पी लाउंजेस 
चेक- इन काउंटर्स.. 

एखादा क्षण एकत्र उभे राहायचो 
‘आ’ वासून पाहणार्‍या 
लोकांच्या घोळक्यामध्ये, 
बोलल्या - न बोलल्या 
गेलेल्या शब्दांमध्ये! 
तळमळत होतो, 
काही सांगण्यासाठी (एकमेकींना.) 
पण घाबरलो होतो, 
घाबरलो होतो, स्वत:लाच!! 

आपल्या सभोवताली लोक ओरडत होते, 
नजरेने फाडून खात होते, 
आणि हा सगळा वेडेपणा 
आपण नुसत्या पाहत होतो, 
‘आपलेच’ चश्मे घालून. 

‘तो’ एकच खराखुरा क्षण 
जगण्याचा प्रयत्न करत होतो, 
एकच नजर, एकच स्पर्श, 
एकत्र असावंसं वाटणं. 
. आणि पुढे जात होतो. 

आपण शेवटचे भेटलो, 
विमानाची वाट बघत, 
मला आठवतंय मी म्हणाले होते, 
‘‘हे आयुष्य जगण्याचा 
यापेक्षा वेगळा काहीतरी 
मार्ग असेल, असेलच न??’’ 

खूप वेळ तू शांत राहिलीस, 
आणि मग, पापणीही न हलवता 
माझ्याकडे वळूनही न बघता म्हणालीस, 
‘‘नाही. कधीच नसतो.!!’’ 

आज 
तू निघून गेलीयेस, 
आणि मी मात्र अजूनही 
धावतेच आहे; 
तू चुकीची होतीस 
हे सिद्ध करण्याचा वेडा प्रयत्न 
मी अजूनही करतेच आहे.! 
- दीप्ती

Wednesday, October 21, 2015

मैं जिंदगी का साथ निभाता चला गया

स्वतःचं स्वप्न बाजूला ठेवून हसत हसत वास्तव स्वीकारणारे मला जास्त ‘हीरॉइक’ वाटतात. वर्तमानाशी झगडत भविष्यकाळ सुंदर करू पाहणाऱ्या या ‘रिअल लाइफ हीरोज’चं म्हणूनच मला खूप खूप जास्त कौतुक वाटतं...


गोष्ट आहे तशी साधीच. आपल्या रोजच्या माहितीतली. गोष्टीचा नायक, अगदी आपल्यातला कोणीही. सकाळी उठून लोकल पकडून ऑफिस गाठणारा. कॉर्पोरेट कंपन्यांचं कोरडं कल्चर वागवत फिरणारा. संध्याकाळी गर्लफ्रेंडला किंवा बायकोला भेटण्यासाठी जिवाचा आटापिटा करणारा. त्याच्या दिवसाची सुरुवात होते, संध्याकाळी ‘तिला’ कुठे भेटायचं, ‘तिला काय काय सांगायचं’, ह्याचं प्लॅनिंग करण्यापासून आणि हा रात्री झोपतो, पुन्हा ‘अरे देवा, उद्या परत ऑफिस!!!’ असं म्हणत म्हणत. शनिवार-रविवारचं याचं शेड्युल पक्कं असतं. जवळच्या मित्र- मैत्रिणींसोबत मज्जा.. खरं तर ऐश करायची. चंगळ करायची. सगळं फ्रस्ट्रेशन तेवढ्यापुरतं भिरकावून द्यायचं आणि मग पुन्हा.. “ मै जिंदगी का साथ निभाता चला गया; हर फिक्र को धुए में उडाता चला गया...”
वरवर पाहता बऱ्याच जणांना वाटेल की हे तर काय, आपलंच आहे की! कित्येक आईबाबांना वाटेल, की यात कौतुक करण्यासारखं काय आहे? हातात पैसा येतो या मुलांच्या पटकन, उडवायला हे मोकळे! अतिशय बेजबाबदार पिढी, चंगळवादी वृत्ती, बेदरकारपणा अंगात मुरलेला, काही सिरियसली घ्यायला नको... आमच्या वेळी...!!!!! त्यांच्या जागी त्यांची तक्रार योग्यच असते म्हणा. पण मला मात्र थोडं वेगळं काही सांगायचंय. एक वेगळीच बाजू या मित्रांकडे पाहिल्यावर जाणवली. ती मांडायचीय.
यांच्यापैकी कित्येक जण हे आत्ता जे काम करतायत, जो जॉब करतायत, तो त्यांना मनापासून पसंत नाहीये. कदाचित यांचे छंद वेगळे होते, स्वप्नं वेगळी होती. त्यांना आयुष्यात वेगळंच काही करून दाखवायचं होतं. बनून दाखवायचं होतं. पण... असं घडलं मात्र काहीच नाही. प्रत्येक वेळेस आपल्याला हवं तेच, आणि हवं तसंच घडतं, असं नाही. प्रत्येक वेळेला आयुष्य एक नवं आव्हान देत असतं आपल्याला पार करण्यासाठी. नाही पूर्ण होत प्रत्येकाची स्वप्नं. नाही प्रत्येकाला मिळत आपल्या मनासारखे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य... यातले अर्धे लोक आज इंजिनिअरिंग करून, मग एम.बी.ए.ची डिग्री घेऊन एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीत सरधोपट चाकोरीचा जॉब करतायत. त्यांना ते फार आवडतंय, अशातला भाग नाहीये. पण त्यांनी हे स्वीकारलंय. काही पर्याय नाही म्हणून स्वीकारलंय. स्पर्धेच्या युगात टिकून राहायलाच हवं, म्हणून स्वीकारलंय. टोकेरी पिअर प्रेशरमुळे स्वीकारलंय...
त्यांच्यापैकी काही जणांच्या आईबाबांना असंही वाटतं की, आपली मुलं ‘लाइनवर’ आलीयेत. “छंदबिंद ठीक आहेत आपापल्या जागी, पण त्याने काही पोट भरत नाही. चार जणांच्या कुटुंबाची जबाबदारी घ्यायची म्हणजे नोकरीचा विचार आधी. मग पगार, गाडी, घर, लग्न, मुलीकडच्यांच्या अपेक्षा...” आलेच आहेत ते लाइनवर. आपापल्या स्वप्नांना, इच्छांना तिलांजली देऊन. आपलं आयुष्य एका वेगळ्याच साच्यात मापून. पार पाडतायत रोजचा दिवस आपल्या घरच्यांना खुश पाहण्यासाठी. झगडतायत रोजच्या रोज स्पर्धेत टिकून राहण्यासाठी. आणि झगडतायत स्वतःच स्वतःशीच...
आपण अनेक चित्रपटांमध्ये बघतो, हीरो शेवटी ‘अपने दिल की सुनो’ म्हणत आपल्या स्वप्नांना गवसणी घालतो. ‘वेक अप सिड’ पाहिला असेल सगळ्यांनी. त्यातला नायक ‘वाया गेलेल्यात’ जमा असतो. नायिका त्याला त्याची पॅशन शोधायला मदत करते. आणि तो त्याच्या छंदामध्येच त्याचा जॉब शोधतो. त्याला त्याचा मार्ग सापडतो. ‘अपने दिल की सुनो...’
मी स्वतः मला मनापासून जे काम आवडतं, ते करते आहे. त्यात कितीही दमले तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा शूटिंगसाठी निघण्याचा उत्साह माझ्यात असतो. माझी पॅशन हाच सुदैवाने माझा व्यवसाय आहे. आणि जर मला हे करता आलं नसतं, तर ते वास्तव मी तरी समजूतदारपणे स्वीकारू शकले असते, असं मला नाही वाटत. खरंच! कोणतीही तक्रार न करता एकाच पद्धतीचं, सरधोपट सर्वसामान्य आयुष्य जगत राहणं खूप कठीण आहे. म्हणून यातला प्रत्येक जण मग स्वतःच स्वतःचं मोटिव्हेशन शोधतो. कोणी महागड्या फोनमध्ये, कोणी शनिवार- रविवार बाहेर जेवायला जाण्यामध्ये. कोणी मॉलमध्ये जाऊन नव्या कपड्यांची खरेदी करण्यामध्ये, तर कोणी ई.एम.आय.वर गाडी घेऊन आपल्या आवडीची गाणी ऐकत लाँग ड्राइव्हवर जाण्यामध्ये. वरवर या चैनीच्या गोष्टी वाटतील कदाचित, पण त्यामागची कारणं मात्र वरवरची किंवा बेजबाबदार नक्कीच नाहीयेत.
चित्रपटाचा शेवट गोड होतो. ‘लाइनवर’ आलेल्या हिरोला त्याच्या आयुष्याचं साध्यही मिळतं आणि त्याची हीरॉइनही मिळते. पण प्रत्यक्ष आयुष्यात सगळं इतकं सहजसोपं नसतं. म्हणून स्वतःचं स्वप्न बाजूला ठेवून हसत हसत वास्तव स्वीकारणारे माझे हे सगळे मित्र मला जास्त ‘हीरॉइक’ वाटतात. वर्तमानाशी झगडत भविष्यकाळ सुंदर करू पाहणाऱ्या या ‘रिअल लाइफ हीरोज’चं म्हणूनच मला खूप खूप जास्त कौतुक वाटतं..!!!

स्पृहा जोशी

Sunday, October 18, 2015

काश्‍मीरचे हास्य परतावे


काही न सुचायचाही एखादा दिवस असतो. जिथे काहीच तुमच्या मनासारखं घडत नाही. आसपास घडणारं काहीच तुम्हाला आवडत नाही. हवा लहरी वाटत राहते. दिवस आडवातिडवा कूस बदलत राहतो. श्वास आतल्या आत कोंडत राहतो. मळभ दाटून आलेलं असतं बाहेर...आणि आतही. मनाला खूप विचारांची वावटळ जितकी त्रास देते, त्यापेक्षा जास्त ही ‘काहीही विचारच नाही सोबतीला’ अशी अवस्था छळत राहते. काही फार दुःखद चालू असतं आसपास असं नव्हे; पण प्रसन्नपणाचा शिडकावाही नसतो. कशामुळे होतं असं, कोण जाणे? पण अनेकदा होतं. चढत जाणा-या उन्हासोबत थरकापत जातो जीव, तेव्हा नक्की कोणाचं आणि कशाचं भय वाटत असतं? आपल्या घरात, सावलीखाली बसलेलो असतानाही भिरभिर वावटळ आपल्याला गिळून टाकेल, असं का वाटत राहतं?

पानगळीत शोषून घ्यावा सबंध जीवनरस एखाद्या झाडाचा, तसं शुष्क आणि म्लान वाटणारं सभोवताल. कधी नाही तर संगीतसुद्धा साथ देत नाही. सूरदेखील आणखी आणखी जखमी करत राहतात.... मला आत्ता असा अनुभव आलाय. आणि खरं तर त्याचं कारणही मला माहीत आहे. रोजच्या रोज ज्या बातम्या येऊन आदळताहेत, त्यामुळे असेल कदाचित; काश्मीरमधल्या प्रलयाच्या बातम्या, तिथली हानी, आटोकाट प्रयत्न करून तिथल्या लोकांना मदत करायला झटणारे लष्कराचे जवान... हे चित्र खूप थकवणारं आहे. आपण फक्त हळहळ व्यक्त करू शकतो. जिने प्रत्यक्ष परिस्थितीत काहीही फरक पडणार नाही, अशी वांझ सहानुभूती व्यक्त करू शकतो. या गोष्टीने स्वतःलाच नुसताच त्रास होत राहतो. गंमत अशी आहे की, यामुळे आपल्या रुटीनमध्ये काहीही फरक पडत नाही. रोजचे नित्याचे व्यवहार चालूच राहतात.

अधिक कदम नावाचा एक मित्र तिथे आहे माझा. त्याची-माझी काहीही ओळख नाहीये; पण तरीही तो मित्र आहे माझा. चमत्कारिक वाटेल हे ऐकायला कदाचित. हे त्याने वाचलं तर त्यालाही वाटेल. कारण रूढार्थाने आम्ही भेटलोच नाहीयोत कधी. मला तो भेटला दोन-तीन वर्षांपूर्वी एका अवाॅर्ड फंक्शनमध्ये. त्याच्या कार्याबद्दल त्याचा तिथे गौरव केला गेला होता. भारावून जाऊन एक चाहती म्हणून त्याला भेटले. मग त्याच्या अनेक मुलाखती मी पाहिल्या. त्याचं निःस्वार्थी बोलणं ऐकलं आणि मला तो मित्रच वाटायला लागला माझा. दहा-एक वर्षांपूर्वी पुण्यातला एक तरुण काश्मीर खो-यात जातो काय, तिथल्या परिस्थितीने हेलावून तिथेच काम करायचं ठरवतो काय... आज अधिकच्या ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन’ने किती मोठं काम उभारलंय तिथे. कित्येक आधार नसलेल्या मुलींना अधिकने घर मिळवून दिलंय. आज ‘भय्या’ आणि ‘बसेरा-ए-तबस्सुम’ त्या मुलींसाठी सारं काही आहे. मला आज यापूर्वी कधीही न भेटलेल्या त्या स्वप्नपंखी डोळ्यांच्या सगळ्या मुलींना भेटावंसं वाटतंय. अधिक करत असलेलं काम या प्रलयात वाहून जाणार नाही, ते दशांगुळे वर ताठ झळकत राहील, याची खात्री तर आहेच; पण पृथ्वीवरच्या स्वर्गावर सुल्तानीने कोपलेला खुदा आता अस्मानीतून त्यांना वाचवेल, त्यांच्यावर मेहेर करेल, अशी प्रार्थना मी सतत करतेय.

स्वतःला झोकून देऊन असं काही जगावेगळं काम जीवनाचं कर्तव्य म्हणून हाती घेण्याची ताकद माझ्या दुबळेपणाला सोसणारी नाही. कुठून येतो हा अदम्य उत्साह अधिकसारख्या लोकांमध्ये? कुठून मिळते त्यांना ही रसरसलेली प्रेरणा? कोणते ग्रह-तारे घडवत असतात त्यांचे मार्ग? मला खरंच माहीत नाही. पण त्या पहाडासारख्या दुर्दम्य इच्छाशक्तीने मला झपाटून टाकलंय. आतून मला आत्ता ‘तिथे’ असावंसं वाटतंय. माझ्या मित्रांनो, या संकटातून तुम्ही सुखरूप बाहेर पडाल. हे सावट निश्चितच विरून जाईल आणि काश्मीरचं ते अख्खं सोनेरी खोरं पुन्हा एकदा ‘बसेरा-ए-तबस्सुम’ (abode of smile) होऊन खदखदून हसू लागेल....इथे बसल्या बसल्या माझ्या बधिर मनातून, विचारशून्य वावटळीतून आलेली ही खरीखुरी दुआ आहे.

- स्पृहा जोशी

Sunday, October 11, 2015

किचनची सुपरस्टार !!

स्टार प्रवाह वर एक नवीन show घेऊन येतेय..
किचनची सुपरस्टार....बघा म्हणजे कळेल.
12 ऑक्टोबर पासून सोम - शुक्र 1 PM.
Promo..


Tuesday, October 6, 2015

वैद्य सरांचं जाणं..

माझ्या वैयक्तिक आयुष्यात बसलेला एक चटका म्हणजे, कविवर्य शंकर वैद्य गेले. मराठी भाषेची तपश्चर्याच केली त्यांनी आयुष्यभर. आणि त्यातून एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व तयार झालं होतं त्यांचं. शांतपणे बोलत बोलत सर त्यांचा मुद्दा पटवून द्यायचे. मृदूपणातला असा खंबीरपणा मी सरांइतका कुठेच पाहिला नाही कधीच ...

प्टेंबर महिन्यातल्या गेल्या पन्नास वर्षांतल्या सगळ्यात जास्ततापमानाच्या दिवशी बसून माझा लेख लिहिते आहे. सगळंच वातावरण तापलेलं. ३७ अंश!! समाजात एकुणातच तापलंय सगळं. अमेरिका भेटीतले मोदी, त्यांना पाहून काहींचं रक्त तापलंय, इकडे महाराष्ट्राच्या विधानसभेत ना महायुती न आघाडी, मधल्यामध्ये इंजिन तापलंय... दक्षिणेत जयललितांना अटक झाली, म्हणून काही आंधळे अनुयायी ताप ताप तापलेत. एकुणात काय, तर आसपास फक्त चटके, वाफा आणि कडकडीत उष्मा. अशी सगळी परिस्थिती आहे.

या उदास दिवसांमध्ये माझ्या वैयक्तिक आयुष्यात बसलेला एक चटका म्हणजे, कविवर्य शंकर वैद्य गेले. त्यांना अंतिम निरोप देताना मी तिथे नव्हते. या अशा प्रसंगी खंबीरपणे उभं राहायचं कसब नाही माझ्यापाशी. पळपुटेपणा आहे खरं तर एक प्रकारचा. चार दिवसांपूर्वी अरुण म्हात्रेंचा मेसेज आला... “सर वाट पाहत होते त्या दिवशी तुझी...” कितीतरी वेळ मी अरुण काकांचा मेसेज पाहत दगडासारखी होऊन गेले. गळ्याशी दुखायला लागलं. डोळे चुरचुरायला लागले. वैद्य सरांची एक एक आठवण उसळी मारून वर यायला लागली.

काय ऋणानुबंध असतात... रूढार्थाने मी सरांची विद्यार्थिनी नव्हते. त्यांचा माझा फार सहवास नव्हता. पण तरीसुद्धा माझे मित्र होते ते. दोस्त होते. मी अकरावीत असताना कॉलेजमधल्या एका कार्यक्रमात सरांना पहिल्यांदा भेटले. आणि मग या न त्या कारणाने भेटतच राहिले. हक्काने कधीही फोन करून मी त्यांना काहीही प्रश्न विचारायचे. त्यांच्याशी वाद घालायचे. पण शांतपणे बोलत बोलत सर त्यांचा मुद्दा पटवून द्यायचे. मृदूपणातला असा खंबीरपणा मी सरांइतका कुठेच पाहिला नाही कधीच. स्वतःच्या कविता खूप मजेशीरपणे ऐकवायचे सर. अगदी प्लेन, आवाजात काही चढउतार न आणता. ‘छत्री’ कविता सगळ्यात फेव्हरेट होती त्यांची. आणि “तुमची कविता मीच तुमच्यापेक्षा छान वाचते”, असं मी त्यांना चिडवलंयसुद्धा!

मिश्कील हसायचे फक्त! एक स्मितहास्य ठेवून टोमणे मारायचे, तेही शालजोडीतले. मराठी भाषेची तपश्चर्याच केली त्यांनी आयुष्यभर. आणि त्यातून एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व तयार झालं होतं त्यांचं. केवढा प्रचंड अभ्यास, किती प्रचंड अधिकार होता त्यांचा या बाबतीत. पण तरीही कातावलेले नव्हते, आयुष्याला कंटाळलेले नव्हते. आणि वयोमानानुसार लहान मुलं, तरुण यांच्याप्रति येणारा कडूपणाही आला नाही त्यांच्यात कधीच. अनेक प्रकांड पंडित लावतात तसला “आमच्या काळी असं होतं...” असा निराशेचा सूर मी ऐकलाच नाही त्यांच्याकडून कधी. उलट नव्या होतकरू मुलांचं कौतुक करण्यात सगळ्यात पुढे. स्वरात कधीही तिरस्कारयुक्त हेटाळणी नाही. उलट कायम हुरूप वाढवणारं प्रोत्साहन. पुढच्या अभ्यासाला नकळत, हलकेच दिशा देणारं. माझं ‘चांदणचुरा’ वाचून मला इतकं सुंदर पत्र लिहिलं होतं त्यांनी... कुठलंही काम बघून, सीरियल बघून सर आवर्जून फोन करायचे. ‘उंच माझा झोका’ तर फारच आवडीची! फोनवरसुद्धा ‘रमाबाई!!’ अशी हाक मारायचे... आणि मग खूप तऱ्हेतऱ्हेचं बोलायचो आम्ही. अगदी त्यांच्यातला कवी ओळखून त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या शाळेतल्या मास्तरांपासून ते त्यांचं दैवत असलेल्या कुसुमाग्रजांपर्यंत. नव्या गाण्यांपासून नाटक- सिनेमापर्यंत. अगदी काहीही...

आम्ही शेवटचे भेटलो, ८ ऑगस्टला. ‘लोपामुद्रा’च्या प्रकाशन सोहळ्याच्या दिवशी. त्यांना भेटायला गेले, आणि चरकले मी. त्यांची तब्येत इतकी बिघडल्याची कल्पनाच नव्हती मला. कौतुकाने मला आइस्क्रीम खाऊ घातलं. माझ्याबरोबर माझी मैत्रीण होती अश्विनी, तिला आमचा फोटो काढायला लावला. भरभरून आशीर्वाद दिला. पुस्तकाची पहिली प्रत मी त्यांच्या हातात ठेवली आणि मलाच भरून आलं. हे पुस्तक त्यांना अर्पण केलंय... अर्पणपत्रिका वाचून कोण खुश झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहताना मला सगळं मिळून गेलं... “आता परत कधी?” निघता निघता मी म्हटलं. सरांनी उत्तर दिलंच नाही. नेहमीचं मिश्कील हसत “सुखी राहा” इतकंच म्हणाले फक्त. “गुणगुणत राहायला पाहिजे. मनात सतत गाणं चालू पाहिजे. शब्द शोधत त्यांच्यामागे धावू नकोस. तेआपोआप तुझ्यापाशी येतील...” सरांचं हे शेवटचं सांगणं. माझ्या मनावर कायमची कोरली का काय म्हणतात न, तशी माझ्यासोबत आहेत. अगदी ठसठशीत. मी त्यांना खूप मिस करतेय. माझे दोन्ही आजोबा गेले, तेव्हा मी अगदी लहान होते. त्यांचं ‘जाणं’ मला आता तितकंसं जाणवत नाही. फारसं आठवतही नाही. पण लौकिकार्थाने माझ्या नात्यातल्या नसलेल्या पण माझ्या खूप जवळच्या असलेल्या या आजोबांचं जाणं मात्र सैरभैर करून गेलं.

वैद्य सरांनी मला कवितेतलं ‘टेक्स्चर’ शोधायला शिकवलं. त्या कवितेचा पोत ओळखायला लावला. स्पर्श, गंध, दृश्य प्रतिमांनी एखादी कविता आपल्याला कशी कवेत घेते, हे पाहायला शिकवलं. आज या रखरखीत उकाड्यात, खिन्न करून टाकणाऱ्या कोलाहलात त्यांची एक कविताच मला त्यातून बाहेर पडायला मदत करतेय. मला शांततेचा आवाज ऐकायला सांगतेय. दृश्य, नाद, रंग, स्पर्श, प्रतिमांच्या संवेदनांची माझ्यावर पखरण करतेय... गुदमरून टाकणाऱ्या गर्दीतून माझं निवांत एकटेपण जपायला लावतेय..!!!!

शांतता - शंकर वैद्य
घराचे पाठीमागले दार उघडले...
तेवढाच काय तो कडीचा आवाज
- बाकी शांतता...
- हिरवी शांतता...
- गार शांतता...
हिरव्यागार बागेत आलेले रेशमी सूर्यकिरण
फुले फुललेली...उमलती शांतता...मंद गंध
नव्हे... प...रि...म...ल
अलगद उडणारी फुलपाखरे
फांदीवर सरडा..सजग...स्तब्ध
पलीकडे उंच आभाळात देवीच्या देवळाचा कळस
त्याभोवती घारीचे भ्रमण
शांततेवर उमटलेला एक वलयाकार तरंग
सरसरत गेलेला पानांचा आवाज...साप
...नंतर कोसळती शांतता
पण मुंग्यांची संथ निमूट चाललेली रांग
...शांतता सजीव...गतिमान
अलगद अलगद तरंगत कुठून तरी आलेले
एक अलवार बाळपीस
वाऱ्याची मंद, नीरव झुळूक
दयाळ पक्ष्याची एक प्रश्नार्थक शीळ
...शांतता मधुरलेली
मऊ मातीवर उमटलेली माझी पावले...त्यांचे ठसे
जादूचे...गूढ
पुढे पुढे नेणाऱ्या पाऊलवाटेचे लाडीक वळण
पुढे गहन...गगन
शांततेत उभे माझे निवांत एकटेपण !

“आता परत कधी?” निघता निघता मी म्हटलं. सरांनी उत्तर दिलंच नाही. नेहमीचं मिश्कील हसत “सुखी राहा” इतकंच म्हणाले फक्त.
“गुणगुणत राहायला पाहिजे. मनात सतत गाणं चालू पाहिजे. शब्द शोधत त्यांच्यामागे धावू नकोस. ते आपोआप तुझ्यापाशी येतील..” सरांचं हे शेवटचं सांगणं.

- स्पृहा