Sunday, December 18, 2011

गर्दी

गर्दी.. खूप तिटकारा आहे मला गर्दीचा.. माणसांचा समुद्र आपल्या अंगावर फुफाटत येतोय असं वाटतं. संध्याकाळच्या वेळी रेल्वे स्टेशन वर पाऊलही टाकायची भीती वाटते.. पायात पाय गुंतलेल्या असंख्य मुंग्या आपल्या अंगावर चालून येतायत.. त्यांच्या असंख्य नजरांचे असंख्य काटे आपल्याला रक्तबंबाळ करत चिरडून टाकतील.. त्यांच्या अगम्य वेगात आपण सुकलेल्या पानासारखे दूर कुठेतरी फरफटत जाऊ असं वाटायला लागतं.. पण एक अनुभव आला गेल्या काही दिवसात.. आणि गर्दी सुंदर कशीदिसू शकते असा एक नवा साक्षात्कार झालाय मला.. मध्यंतरी सवाई गंधर्व महोत्सवाला जाण्याचा योग आला..  भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या कल्पनेतून साकारलेला, संपूर्णपणे शास्त्रीय संगीताला वाहिलेला हा महोत्सव. पुण्याच्या गुलाबी थंडीतली हसरी संध्याकाळ आणि सुरांच्या  चांदण्यात न्हाऊन निघणारे हजारो  रसिक... आकड्यांच्या भाषेत 'गर्दीच'..

पण विलक्षण सुंदर.."गेल्या ५९ वर्षांच्या श्रीमंत परंपरेचं हे संचित आहे. आपण काहीतरी खूप छान ऐकायला आलोय.. पवित्र असं काही इथून घेऊन जाणार आहोत", हा आनंद त्यातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटलेला.. अतिशय सामान्य मंडळींपासून ते सेलिब्रिटिंपर्यंत आणि मध्यमवर्गीयांपासून ते गर्भश्रीमंतांपर्यंत सगळ्यांचीच उपस्थिती.. साठ वर्षांच्या आजी आजोबांपासून सतरा वर्षांच्या युवकांपर्यंत सगळ्यांना कोण उत्साह.. जागतिक कीर्तीचे कलावंत आपल्या अंगणात येऊन कलेचा नजराणा आपल्यासमोर ठेवतायत हा सार्थ अभिमान, त्या परंपरेच्या जनकाविषयी अपार कृतज्ञता.. आणि संगीत आणि केवळ संगीतात भिजून जाण्याची अनिवार ओढ... कुठेही थिल्लरपणा नाही, अभिजाततेला धक्का लागेल अशा 'पॉप्युलर डिमांड्स' नाहीत.. संपूर्ण तन्मयता.. शंकर महादेवन यांचं गायन झालं आणि ओसंडून वाहणारी १२ हजार माणसं जेव्हा टाळ्यांचा कडकडाट करत त्या गुणी कलाकाराला दाद देण्यासाठी उभी राहिली; तेव्हा अंगावर सर्रकन काटा आला माझ्या.. त्या क्षणी ती गर्दी नव्हती... ते 'एक' चैतन्य होतं.. मूर्तिमंत उर्जा होती..   नकळत पाणी आलं डोळ्यांत. मनावर कायमचा ठसा उमटवून गेलीये ती संध्याकाळ. ती गर्दी एकदम आपलीशी वाटायला लागली.. हा अनुभव देणाऱ्या 'गर्दी'ला कुठे ठेवू आणि कुठे नको असं होत होतं. मनात तृप्तीचे सूर रेंगाळत असताना वपुंची वाक्य आठवली.. "नभांगणातल्या चांदण्या मोजायच्या नसतात.. आपल्यावर त्यांचं छत आहे या आनंदात विहार करायचा असतो. आनंद, समाधान, तृप्ती, कृतज्ञ भाव, स्नेह या भावनांना तराजू असते, तर एव्हाना हे सगळे काळ्या बाजारात गेले असते. त्यांचं स्मगलिंग झालं असतं. इतकंच कशाला त्यांच्यावर इन्कमटॅक्सही बसला असता.. मग एक माणूस साधा हसलाही नसता. आनंदाच्या उकळ्या दाबून दाबून माणसं फुटली असती. तेव्हा 'नक्षत्रांच देणं' चुकवता येत नाही, ह्यातच त्यांची उंची.." ते देणं देणारी अशी ती.. सुंदर गर्दी !!!!