Tuesday, October 25, 2011

यशस्वी

यश म्हणजे काय? याविषयावर हल्ली माझं माझ्याशीच कडाक्याचं भांडण व्हायला लागलंय. आपण ज्या वाटेवरून चाललोय, त्या वाटेवर सध्या तर कौतुकच कौतुक वाट्याला येतंय आपल्या.. मग बाकीच्या मित्र मैत्रिणींच्या वाट्याला ते थोडं जास्त येतंय हे दिसल्यावर पोटात का दुखतं आपल्या? प्रत्येकाचा स्वतःचा असा एक 'पेस' असतो... आणि त्यात सामावणारी प्रत्येकाची एक 'स्पेस' असते.. हे सगळं कळत असून 'यश' खेचून घ्यायचा अट्टाहास का चाललाय? कुठल्याही कार्यक्रमानंतर 'कार्यक्रम छान झाला', यापेक्षा "आज पाकीट आपल्याला किती, आणि 'त्याला' किती इतका घाणेरडा विचार का येतोय डोक्यात? तरी बरं, आत्ता कुठे सुरुवात होते आहे करियरला... जगण्याला. पण 'जगणं' नेमकं कळायच्या आधीच ही तुटत जाण्याची जाणीव कशामुळे येतेय? स्पर्धा, असुरक्षितता या सगळ्यात जे खरंच मिळवायचंय ते मिळतंय का नुसताच आभास आहे यशाचा? आपणच आपल्या भोवती विणून घेतलेला किती भयानक कोश आहे हा.

हवं तेव्हा, हवं तितकं खळखळून हसता येणं म्हणजे यश नाही?
मान्यवरांनी पाठीवर शाबासकीची थाप देणं म्हणजे यश नाही?
प्रामाणिक समीक्षकांकडून कौतुकाची दाद येणं म्हणजे यश नाही?
जवळच्या मित्रांना आपल्याकडे कधीही मन मोकळं करता येण्याचा विश्वास वाटणं म्हणजे यश नाही?
जवळच्या मित्राने केलेला आघात विसरून त्याच्यावर तरीही प्रेम करता येणं, म्हणजे यश नाही?
एखादी सुंदर कविता, लेख, चित्रपट, शिल्प, चित्र यांचा आनंद घेता येणंसौंदर्याचं कौतुक करता येणं  म्हणजे यश नाही?
आपल्या प्रतिस्पर्ध्यामधलं चांगलं शोधता येणं म्हणजे यश नाही?
आपल्यामुळे किमान एक तरी जीव रात्री हसून झोपतो हे समाधान, म्हणजे यश नाही?

हे सगळं जमत होतं आपल्याला, अगदी आत्ताआत्तापर्यंत. मग तेव्हाच खरंतर जास्त यशस्वी होतो आपण असं म्हणायला हवं.. ही भूक, ही वखवख का? कुठून आली ती? कोणासाठी आहे आहे ती? माझ्यासाठी? पण मग मी तर खूप आनंदात असायला हवं. माझ्याचसाठी तर चाललंय सारं काही..
तसं होत मात्र नाही.. मग एक त्याचंही एक वेगळंच फ्रस्ट्रेशन. आणि पुन्हा लोकांच्या सहानुभूतीवर आपला अधिकारच आहे, अशी स्वतःचीच समजूत घालून घेणं. हे का लक्षात येत नाही की आपल्याला जे वाटतं, ते आपल्यासोबत जे घडतं त्यामुळे नाही. कारण आपण गोष्टी नेहमीच आपल्याला हव्या तशा इंटरप्रिट करू पाहतो. त्यांचं प्रत्यक्षातलं रूप आपल्याला बघायचं नसतं. मग त्या आभासी विश्वात रमणं सुरु होतं. आणि तेच आवडायला लागतं हळूहळू. कारण सरळ आहे, तसं करणं सोपं असतं. तिथे खऱ्याखुऱ्या प्रश्नांचा सामना करायचा नसतो. आपल्या पळपुटेपणा झाकायचा तो उपाय होऊन जातो.. पुढे जाऊन त्याची ज्यांना त्याची सवय होते, आणि जे असे सराईत पणे वागायला शिकतात त्यांना आपण 'यशस्वी' अशी उपाधी देऊन टाकतो. आणि मग त्यांच्या 'सर्कल' मध्ये शिरायची धडपड करत राहतो. या पद्धतीने 'यशस्वी' होणं तसं फार अवघड नाहीये. दोनच गोष्टी कराव्या लागतात. एक, तुम्हाला नक्की काय हवंय हे  ठरवायचं. आणि मग त्यासाठी जी किंमत द्यावी लागेल, ती द्यायची. ती किंमत तुमचं समाधान, संसार, तत्त्वं, मन, यापैकी काहीही असू शकते. हे जमलं की मग आलंच सगळं !


माझा प्रॉब्लेम जरा वेगळा आहे. मला यशस्वीही व्हायचंय आणि ही किंमतही द्यायची नाहीये. त्यामुळे मी सध्या उलटा विचार सुरु केलाय.. 'समाधानी' होऊ शकेन का, याचा.. बघूया, त्यात 'यशस्वी' होता येतंय का ते. कारण इतकी खात्री आहे, की हे यश कायमचं टिकणारं असेल. माझं हसू हिरावणारं नाही, तर ते आणखी खुलवणारं असेल!


20 comments:

 1. khupach chhaan... some people start their career and get lost in between due to monetary gains rather than focusing on good and quality work... I am sure with your pace, this is just AABHAAS... So relax and chillax and everything shall fall into its proper space (muddamunach space lihile) :)

  Deepawali chya hardik shubhechha!

  ReplyDelete
 2. waaa khupach chan sundar manala bhidnare ahe ekdum..........

  ReplyDelete
 3. Spruha, khup sundar lekh, mala Ralph Waldo Emerson chya eka quote chi athavaN zali -

  "To laugh often and much; to win the respect of intelligent people and the affection of children; to earn the appreciation of honest critics and endure the betrayal of false friends; to appreciate beauty, to find the best in others; to leave the world a little better; whether by a healthy child, a garden patch or a redeemed social condition; to know even one life has breathed easier because you have lived. This is the meaning of success." - Ralph Waldo Emerson

  ReplyDelete
 4. माझ्या मते -
  यश म्हणजे बदल घडवून आणण्याची किंवा होणारा बदल थांबविण्याची क्षमता.
  तुम्हाला मोबदल्यात किती पैसे मिळतात किंवा तुम्हाला किती लोक ओळखतात या गोष्टींना काही महत्व नाही. नकाशावरही नसलेल्या एखाद्या खेड्यात तुटपुंज्या पगारावर काम करत शिक्षणाचा प्रसार करणारा शिक्षक यशस्वी नसतो काय?
  एकदा हे सगळं नीट कळलं की इतर गोष्टींचा परिणाम होत नाही.

  ReplyDelete
 5. Yashachya babtit asa vichar karna yatach tujha yash aahe Spruha....keep it up.

  ReplyDelete
 6. भारी लिहितेस गं तू ..

  ReplyDelete
 7. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 8. सुंदर! हा विचार करता येणं हेसुद्धा यशच, त्यामागची कळकळ, तगमग दुसऱ्याला समजावणं हेसुद्धा तितकंच मोठं यश! कदाचित गडबड इथेच होते की आपण दुसऱ्यांच्या नजरेत यशस्वी व्हायला बघतो. स्वतःच्या कल्पनेतील यश आणि समाधान ही दोन ठिकाणं वेगळी नव्हतीच हे उमगणं म्हणजे यश असावं :)

  ReplyDelete
 9. पुलंच्या "रावसाहेब" या व्यक्तिचित्रणात एक वाक्य आहे. ते इथे चपखल बसत, "कित्येकदा अपयशापेक्षा यशामुळेच माणस अधिक मुर्दाड बनतात." हे वाक्य आपल्याबाबतीत खर होऊ नये याची काळजी स्वतःची स्वतःलाच घ्यावी लागते.

  ReplyDelete
 10. Ekunat kay, tar asha tarhene phar yashasvi asnyapeksha, nikhal apayash parvadla.

  ReplyDelete
 11. kharach apratim ...I liked it...tujha far motha Fan..unknown artist

  ReplyDelete
 12. me sudhha sadhyaa khup khup confuse state madhye aahe manaatal kahitari tuzya shabdantun umatalyaasarakh vatatay .......

  what is success is the biggest unanswered question as it depends up on everybodys own perception ..

  aani mala successs yash havay as i cant be exeption for human tendency .. so mala yash havay pan tatwa ani nishta sacrifice karun nahi ,,,,

  so lets c hoping for the best ,,,

  all the best to u too :)

  ReplyDelete
 13. अगदी टू द पोईंट लिहीलएस... प्रत्येकाची 'यशस्वी'होण्याबाबतची व्याख्या ही वेगळी असते, ती त्याने स्वत: बनवलेली असते... मग मध्येच असे काही क्षण येतात कि आपण बिलकुल उलट्या दिशेने चालू लागतो... अगदी नकळत; आणि मग कुठेतरी 'हलल्यासारखं' होतं... माझ्यामते तीच वेळ असते, थोडा शांतपणे विचार करायची, आणि व्याख्या पुन्हा डिफाईन करायची...
  बाकी लेख खूप मस्त!

  ReplyDelete
 14. खूपच छान लेख आहे स्पृहा ! हा विचार इतक्या खुलेपणाने लोकांसमोर मांडणं आणि योग्य वेळी आपल्याला 'खरं यश काय आहे' हे कळणं ह्या दोन्ही गोष्टी खूप मोठ्या आहेत ! keep it up ! :)

  ReplyDelete
 15. Spruha विचार खूप मस्त आहे.

  ReplyDelete
 16. Mahit nahi hote ki tu liites pan. Nuktech kuthetari paper madhe wachale ni search karawe mhanun kela, tar blogs chi link milali.
  Wachnachi aawad ahe mhanunach nahi, tar khupach chan ahe mhanun wachatoy, atyant sundar lihites tu, mhanjech wichar khup sundartene prakat kele ahes. Khup aawadale.
  Success ni satisfication, donhi milwane awghad asate, pan I wish tumhala te donhi milel, tehi kashyachyahi compromise na karata. Best of luck!!!

  ReplyDelete
 17. yashapeksha samadhanachi kimmat jasta mothi ahe, karan samadhan milavnyasathi apan laukikarthacha yasha nahi ka nakarat? Pan Samadhanachi jhop jasta gadh aste.. laukikarthachya yashapeksha, mojlelya kimtipeksha!

  ReplyDelete
 18. Spruha, agadi manatla bolalis mazya , malahi agadi asech prashna padtat..ajunahi konala tari asa vatata he baghun bara vatla

  ReplyDelete
 19. spruha tu yash chi navin definition sagitleess atishay sunder, ani kayam che tiknarii

  ReplyDelete
 20. यश असं मुळात काही नसतंच ! ते फक्त समोरच्याला वाटत असतं. यश मिळवणारा मात्र आपलं काम प्रामाणिकपणे आणि आनंदाने करीत असतो.

  ReplyDelete