Thursday, July 7, 2011

आनंदाचा कंद, विठ्ठल सावळा!

आषाढी एकादशी आली...आत्ता चंद्रभागेच्या वाळवंटात एकच आनंद भरून राहिला असेल..हरिनामाचा उद्गार आसमंत व्यापून राहिला असेल.. हजारो- लाखो साधे सुधे,भोळेभाबडे जीव विठ्ठल रंगात रंगून गेले असतील. आणि आपण?? टीव्हीवर आणि पेपरात वारी पाहणारे आपण.. त्यांच्या श्रद्धेला तुच्छ लेखत डेली सोपच्या बिनडोक एपिसोड मध्ये नाहीतर पेज थ्रीच्या चमचमीत गॉसिप मध्ये रमणारे आपण..  'कशाला इतका वेळ त्या वारी-बिरी मध्ये फुकट घालवतात हे लोक! मूर्खपणा आहे सगळा..' असं म्हणत वारीमागच्या लॉजिकलाच 'डाऊन मार्केट' करून टाकणारे आपण!! आपल्या सामान्यपणाच्या कोशालाही अहंगंडाने चिकटून राहणारे आपण..!! खूप उचंबळून येतं मला हे सगळं वाचताना, त्या वेड्या वारकऱ्यांना पाहताना. त्यांच्या चेहऱ्यावरचं ते वेगळंच समाधान पाहताना..आपल्या 'शहाण्या' जगण्यात कधी इतकं निर्मळ हसतो आपण? कधी आवेगाने व्यक्त होतो? कधी श्वास घेतो मोकळेपणाने? 'वारी' हेच शिकवत असणार त्यांना. रोजच्या कष्टांनी गांजलेल्या, हालांनी पिचलेल्या जाण्यावर मायेची थंड फुंकर घालत असणार वारी.. हे अनुभवायचंय मला, त्यांच्यातलीच एक होऊन डोक्यावर वृंदावन घ्यायचंय, रिंगण धरायचंय ,स्वतःला विसरून जायचंय. आयुष्यात एकदा तरी, एकदा तरी वारीला जायचंय..!!!

आनंदाचा कंद    विठ्ठल सावळा
वैजयंती माळा    शोभे कंठी
जिवालागी जीव   ऐसा गा जडला
वेडापिसा झाला   तुझ्या पायी
संसाराची वाट      अनवट जरी
हात तुझा शिरी     असो द्यावा
मनातच वारी     मनात गजर
मनात पाझर      चंद्रभागा
देहाचेच आता     जाहले मंदिर
आतला अंधार     लोपलासे..

- स्पृहा.

8 comments:

  1. As usual एकदम झकास !!!

    ReplyDelete
  2. खुप छान. तुमच्या सारखीच वारीला जाण्याची इच्छा बहुतेकांची असते. ओवी प्रमाणे वारी देखिल अनुभवावीच नाही का?

    ReplyDelete
  3. भावलं.. थेट मनाला भिडलं.. :)

    ReplyDelete
  4. देहाचेच आता जाहले मंदिर/
    आतला अंधार लोपलासे..//

    खूप सुरेख !!!
    :)

    भक्ती
    http://swarnim-sakhi.blogspot.com/

    ReplyDelete
  5. मनातच वारी मनात गजर/
    मनात पाझर चंद्रभागा//

    देहाचेच आता जाहले मंदिर/
    आतला अंधार लोपलासे..//

    kshanbhar vitthal disalyacha bhas zala....

    ReplyDelete
  6. चांगला विषय...
    कविता अतिशय सुरेख
    नेहमीप्रमाणे !

    ReplyDelete